दोंडाईचा – शहरासह ग्रामीण भागात चोरीच्या घटना घडणे ही नित्याचीच बाब झाली आहे. बुधवारी शहरातील शहादा रस्त्यावरील दूध संघातून फॅट मशीन चोरीची घटना घडली. चोरीच्या वाढलेल्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत वाढली आहे.
याबाबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात अमरदिप प्रभाकर पाटील(रा. विद्यानगर दोंडाईचा ता. शिंदखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दादासाहेब रावल दूध उत्पादक संघात परिसरातील दुधाचे संकलन केले जाते. दूधाची प्रत तपासणी करण्यासाठी इंडिफोस कंपनीचे मशीन आहे. फॅट मशीन संघाच्या आवारातील चीलिंग सेंटरच्या पत्र्याचे शेड असून त्याठिकाणी सायंकाळी सात ते 11 वाजेपर्यंत काम चालते तसेच चीलींग प्ल्यानच्या बाजूस एकवीरा मिल्क प्रोडक्ट पॅकिंगचा प्लॅन आहे. त्यांचे देखील कामकाज आमच्या वेळेप्रमाणे असते दि. 27 रोजी रात्री काम करून घरी गेलो मात्र दि. 28 रोजी सकाळी आमच्या सहकाऱ्यांसह कामावर आलो असता त्याठिकाणी फॅट मशीन आढळून आले नाही. मशीनचा इतरत्र शोध घेतला असता ते मिळून आले नाही. सदर मशीन कुणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरी करून घेऊन गेल्याचे स्पष्ट झाल्याचे आढळून आले. जवळपास दोन लाखाचे मशीन लंपास करण्यात आले असून दोंडाईचा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.
आगामी निवडणुका सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या चोऱ्या बघता आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलीस निरीक्षक परदेशी यांनी तात्काळ या घटनेला लगाम लावावा, अशी अपेक्षा दोंडाईचेकर व्यक्त करीत आहे.