राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट आमदार म्हणून आ.कुणाल पाटील यांचा गौरव

धुळे – महाराष्ट्र विधानसभेत आणि राजकीय क्षेत्रात अत्यंत महत्वाचा व मानाचा असलेला उत्कृष्ट आमदार पुरस्कार देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांना देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार म्हणजे धुळे ग्रामीण आणि खान्देशवासियांसाठी गौरवाचा क्षण मानला जात आहे. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने उत्कृष्ट आमदार म्हणून उत्कृष्ट भाषण या विभागात हा पुरस्कार आ.पाटील यांना सन 2023-24 करीता देण्यात आला आहे. त्यामुळे धुळे ग्रामीण आणि जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या पुरस्कारामुळे धुळे तालुक्यासह जिल्हयात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी विधीमंडळाच्या कामकाजात सातत्याने प्रयत्नशील राहून उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट आमदार म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मंगळवार दि.3 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई येथे महाराष्ट्र विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पुरस्कार वितरणाचा दिखामदार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषण या विभागात पुरस्कार देवून आ.पाटील यांचा गौरव करण्यात आला. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणूकीत आ.कुणाल पाटील हे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा मताधिक्क्याने निवडून आले आहेत. दांडगा जनसंपर्क, विकास कामांची धडाडी आणि जनसामान्यासाठी संघर्ष करणे त्यासोबत धुळे तालुक्यातील सिंचन चळवळीमुळे आ.पाटील यांची पाणीदार आमदार म्हणून राज्यात ख्याती आहे. राज्याचे माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत आ.पाटील हे धुळे तालुक्यात समर्थपणे काम सांभाळत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतांना धुळे जिल्हयात काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्याचे काम आ.पाटील यांनी केले आहे. विधानभवनातील विविध संसदीय आयुधांचा अभ्यासपूर्ण वापर करुन आ.कुणाल पाटील यांनी धुळे तालुक्याचे प्रश्‍न मांडले. त्यामुळे धुळे तालुक्यात सिंचन,कृषी,आरोग्य,शिक्षण,रस्ते तसेच गावातील मुलभूत विकासाला गती मिळाली. धुळे ग्रामीणमधील जनतेसह राज्यातील सर्वसामान्यांचा आवाज आ.कुणाल पाटील यांनी विधानभवनात बुलंद केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आ.पाटील यांनी विधानसभेच्या अधिवेशनात दोन वेळा तालिका अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आपल्या वकृत्व आणि नेतृत्व कौशल्याची चूणुक त्यांनी दाखवली होती. राज्यातील आणि मतदारसंघातील प्रश्‍न अभ्यासपूर्ण भाषणातून जनतेचे प्रश्‍न प्रभावीपणे मांडल्यामुळे आ.कुणाल पाटील यांचा आज राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषण या विभागात पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी झालेल्या सन्मान सोहळ्याला राष्ट्रपतींसोबत महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, विधान परीषद उपसभापती नीलम गोर्‍हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. आ.कुणाल पाटील यांना पुरस्कार मिळल्याबद्दल धुळे ग्रामीण मतदार संघासह जिल्हयात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares