धुळे – सप्टेंबर महिना संपेपर्यंत विद्यार्थी हिताच्या दृष्टीने शाळांनी वनभोजन सह शैक्षणिक सहलीचे जिल्हा व जिल्ह्याबाहेर आयोजन करू नये यासाठी त्वरित मनाई आदेश काढावे, असे निवेदन धुळे जिल्हा शिक्षक भारती संघटनेतर्फे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सुधाकर बागुल, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेंद्र सोनवणे सह धुळे मनपा शिक्षण मंडळ पर्यवेक्षक गणेश सूर्यवंशी यांना देण्यात आले.
राज्यातील पुणे वेधशाळेने काही दिवसापासून धुळे जिल्ह्या सह शेजारील जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यतेबाबत बाबत वारंवार सूचना देत आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात सरासरी पेक्षा जास्त पावसाची शक्यता ही वर्तविण्यात येत आहे तर काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे त्या संदर्भात धुळे जिल्हा प्रशासन नागरिकांना दक्षता घेण्याबाबत वारंवार सूचना देत आहेत
धुळे जिल्ह्यात ही काही दिवसांपासून ढगाळ सदृश्य वातावरण व सूर्यदर्शन देखील नाही त्यामुळे मुसळधार पाऊस कधी कोसळेल हे ही सांगता येत नाही अशा परिस्थितीत धुळे शहरासह, जिल्ह्यातील काही शाळा शिक्षण विभागाची पूर्वपरवानगी न घेता पावसाळी वनभोजन सह शैक्षणिक सहलीचे आयोजन करीत आहे त्यामुळे पालक वर्ग आपल्या पाल्याचा बाबतीत चिंतीत आहे. अशा परिस्थितीत शाळांनी जिल्हा व जिल्ह्याबाहेर शैक्षणिक सहल आयोजन करणे कितपत योग्य आहे. शाळांनी सहलीच्या आयोजनापूर्वी प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची तसेच धुळे मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. काही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.
धुळे जिल्ह्यातील निमडाळे येथील शाळेने काही दिवसांपूर्वी सहलीचे आयोजन केले होते त्या ठिकाणी दोन शालेय विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे अशा घटना ताज्या आहेत. प्राथमिक, माध्यमिक जि प शिक्षण विभाग तसेच धुळे शहरातील मनपा शिक्षण मंडळ विभागाने आपापल्या कार्यक्षेत्रातील शाळेतील विद्यार्थी हिताचा विचार करून पावसाळा संपेपर्यंत किंवा सप्टेंबर अखेर पर्यंत कुठल्याही शाळांनी जिल्हा व जिल्ह्याबाहेर शैक्षणिक सहलीचे आयोजन किंवा वनभोजन सहलीचे आयोजन करू नये, यासाठी मनाई आदेश लवकरात लवकर काढावा अशी विनंती धुळे जिल्हा शिक्षक भारती संघटनेतर्फे करण्यात येत आहे. यावेळी विभागीय अध्यक्ष विनोद रोकडे, राज्य संघटक सचिव अशपाक खाटीक ,धुळे जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील, छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव नानाभाऊ महाले, कार्याध्यक्ष खेमचंद पाकळे, संघटक संजीव पावरा, जयवंत देवरे, किरण मासुळे, राजेश शिरोडे, सुधाकर पाटील ,दामोदर पाटील इत्यादी उपस्थित होते.
पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता शाळांनी शैक्षणिक सहलीचे आयोजन करू नये काही दुर्घटना घडल्यास त्यास मुख्याध्यापक जबाबदार राहील, असे
प्राथमिक शिक्षणाधिकारी महेंद्र सोनवणे यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी निमडळे येथील शाळेची दुर्घटना घडली असून त्यापासून बोध घेणे आवश्यक आहे त्यामुळे शाळांनी सध्या सहलीचे आयोजन टाळावे, असे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सुधाकर बागुल यांनी म्हटले आहे. मनपा शिक्षण मंडळ पर्यवेक्षकगणेश सूर्यवंशी यांनीही याबाबत आदेशित केले आहे.