शिंदखेडा – कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या भाविकांच्या इको कार व बोलेरो पिकअप व्हॅन यांच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ हा भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता त्यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. जखमींना धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शिंदखेडा तालुक्यातील वारूड येथे गणपती उत्सव निमित्त कीर्तनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .कीर्तनाच्या कार्यक्रमास शिंदखेडा येथून एम एच१८ बीएक्स ०५३९या इको कारने सात भाविक वारूड येथे गेले होते. कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून रात्री एक वाजता हे भाविक या गाडीने शिंदखेडा येथे परतत असताना दसवेल गावाजवळ समोरून येणाऱ्या बोलेरो पिक
अप व्हॅनने(एम एच०४ईवाय६०२१) या गाडीने समोरून इको कारला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की त्यामुळे दोघेही वाहनांचा चक्काचूर झाला. इको वाहनात असलेले भाविक सुनील दंगल कोळी (कुवर) वय 30, रा. परसामळ, मंगलाबाई लोटन देसले (वय 59) रा. गांधी चौक, शिंदखेडा, विशाखा आप्पा माळी (महाजन) वय १३, रा. धानोरा,(हल्ली मुक्काम शिंदखेडा), मयुरी पितांबर खैरनार (परदेशी) वय 28, रा. विजयनगर, शिंदखेडा यांना शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात रात्री दीड वाजता आणले असता डॉक्टर कुंदन वाघ यांनी तपासणी करून मृत घोषित केले तर चालक जयेश गुलाब बोरसे (वय 22), रा. वारूड,(ता.शिंदखेडा) यास नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आले त्या ठिकाणी डॉक्टर मनोज राजपूत यांनी तपासणी करून जयेश या मृत घोषित केले.
तर आशा आप्पा माळी, प्रेम संदिप पाटील, खुशाल अरुण चौधरी आणि बोलेरो पिकअप चालक सचिन चौधरी रा. शिंदखेडा जखमी झाले आहेत. जखमींना धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
इको कारचा चालक जयेश भाऊ याचे चुलत काका रवींद्र निळकंठ बोरसे यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशनला बोलेरो पिकप यांचा चालक सचिन चौधरी याचे विरोधात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार चालक सचिन चौधरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत जयेश बोरसे हा वारूड येथील योगेश चौधरी यांचे मालकीची इको गाडी क्र. MH-18 BX-0539 हीचेवर चालक म्हणुन रोजंदारीने काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. काल दिनांक 14/09/2024 रोजी वारुड गावात गणपती उत्सव निमीत्त एक दिवसाचे भागवत कथेचा कार्यक्रम आयोजित आयोजित करण्यात आला होता. त्या भागवत कथेत सहभागी असलेल्या भाविकांना वारूडहून शिंदखेडा येथे रात्री एक वाजता परत येत असताना हा अपघात घडला.***
शिंदखेडा शहरापासून सात किलोमीटर अंतरावर घडलेल्या या अपघातात मृत्यू झालेल्या भाविकांपैकी शहरातील तीन भाविक होते. त्यात तिघही महिला भाविक होत्या. या अपघातामुळे संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरली आहे.
*****अपघातामध्ये मुलीचा मृत्यू तर आई जखमी—
वारुड येथे आयोजित कीर्तन कार्यक्रमास शिंदखेडा तालुक्यातील धानोरा येथे मूळ रहिवासी असलेले परंतु हल्ली शहरातील जाधव नगर भागात राहणाऱ्या आशाबाई आप्पा माळी व मुलगी विशाखासह गेल्या होत्या. परंतु दुर्दैवाने या अपघातात विशाखाचा मृत्यू झाला आहे .आई आशाबाई या जखमी असून त्यांच्यावर धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.