शिंदखेडा तालुक्यातील एन. डी. मराठे विद्यालयाने राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतंर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धात्मक अभियानात खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये या शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.सलग दुसऱ्या वर्षी या अभियानात या शाळेने यश मिळवले.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा-१ मध्ये तालुका व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक तसेच नाशिक विभागात द्वितीय क्रमांक शाळेने पटकावला होता. याबद्दल मा.मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे मा. शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्या हस्ते शाळेला १५ लक्ष रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले होते.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती निर्माण करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे, शासनाच्या ध्येय धोरणांशी सुसंगत शालेय प्रशासनाच्या बळकटी करणास चालना देणे, शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादनूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे होती.
या अभियानात शालेय पायाभूत सुविधा-३३ गुण, शासन ध्येय-धोरणे अंमलबजावणी-७४ गुण व शैक्षणिक संपादनूक-४३ गुण. एकूण १५० गुणांसाठी वरील मुद्द्यांना अनुसरून मूल्यांकन करण्यात आले.
शाळेच्या या यशाबद्दल गटविकास अधिकारी श्री. आर. डी. वाघ, गटशिक्षण अधिकारी डॉ. सी. के. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. सी. एस. खर्डे, केंद्रप्रमुख श्री. सी. जी. बोरसे संस्थेचे अध्यक्ष श्री. साहेबरावजी मराठे व मुख्याध्यापक श्री अमोल मराठे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.