आपला भाऊ चेअरमन असल्याचे धमकावून शिपायांकडून पैशांची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाला दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. हि घटना जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील नागरी एज्युकेशन सोसायटी बॉईज हायस्कुल येथे घडली. धुळ्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हि कारवाई केली.
आपल्या भावाची संस्थेच्या चेअरमन पदावर निवड झाली आहे. त्यामुळे तुम्हाला नोकरी टिकवायची असेल तर, शाळेतील प्रत्येक शिपायाला प्रत्येकी दहा हजार रुपये जमा करावे लागतील असे फर्मान मुख्याध्यापकाने सोडले मात्र, तक्रारदाराची पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला आणि रीतसर तक्रार नोंदवली. त्या अनुषंगाने नागरी एज्युकेशन सोसायटी गर्ल्स हायस्कुल मध्ये कार्यरत असलेल्या तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार संस्थेच्या बॉईज हायस्कुल मध्ये उपशिक्षक असलेले आणि सध्या मुख्यध्यापक पदावर पदोन्नती झालेले गौतम मिसर यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
मुख्याध्यपक गौतम मिसर यांचे भाऊ मिलिंद मिसर हे संस्थेचे चेअरमन असून आपल्या भावाचा धाक दाखवून त्यांनी शाळेतील सर्व शिपायांकडून प्रत्येकी दहा हजार रुपयांची मागणी केली. मात्र , तक्रादाराने त्यांच्या धमकीला न घाबरता लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्याने ही कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे उपाधीक्षक सचिन साळुंखे, निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे , संतोष पवारा, रामदास बारेला , प्रशांत बागुल , मकरंद पाटील , प्रवीण पाटील, सुधीर मोरे , जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली.
प्रतिनिधी कार्तिक सोनवणे