दारू का पिता?असे विचारणाऱ्या मुलांवर बापानेच केला चाकूने हल्ला

दारूमुळे संसार उध्वस्त होतात, कुटुंबे बरबाद होतात, दारूच्या नशेत हातून अनपेक्षित कृत्य घडते. अश्या अनेक घटना आपल्याला रोज कुठे न कुठे घडल्याचे वाचायला मिळते. अशीच एक घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडली. इथे मात्र वडिलांनी मुलांना समजविण्याऐवजी मुलांनी दारू पिणाऱ्या बापाला समजवण्याचा प्रयत्न केला. दारू का पिता, दारू पित जाऊ नका असे मुलांनी सांगितल्याचा राग आल्याने संतापलेल्या बापाने चाकूचे वार करून दोन्ही मुलांना जखमी केल्याची घटना घडलीय.
किरणकुमार रामेचत धुरिया असे या हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याचा मुलगा बिपीनकुमार धीरीया याने दिलेल्या फिर्यादीनुसार हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास हि घटना घडल्याची तक्रारीत नोंद आहे. या घटनेतील फिर्यादी व त्याचे वडील उरळी देवाची येथील आदर्श नगरमध्ये राहतात. फिर्यादी बिपीनकुमारचा भाऊ विवेक कुमार याने आपल्या वडिलांना त्यांच्या घरी जाऊन दारू का पितात, दारू पित जाऊ नका असे सांगितले. मुलांनी आपल्याला सांगितल्याचा राग आल्याने वडिलांनी घरातून चाकू आणून फिर्यादीच्या भावाच्या डाव्या हातास मारला. हे सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादीच्या हि डाव्या हाताला दंडावर चाकूने जखम झाली. या घटनेचा तपास पोलीस हवालदार भोसले हे करीत आहेत. परंतु या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा होते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares