जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा पोलीस प्रशासनाने अनोखी संकल्पना राबवली. ‘परिवर्तन’ या उपक्रमाच्या माध्यमातून भरकटलेल्या आणि गुन्हेगारीकडे वळालेल्या तरुणाईला पुन्हा योग्य मार्गावर वळवण्याचा प्रयत्न करणारा हा उपक्रम आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या पुढाकाराने जिल्हाभर हि संकल्पना सर्व पोलीस ठाण्यांतर्गत राबवण्यात आली. प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत असलेले गुन्हेगार, हिस्ट्री शिटर्स यांना त्या त्या पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. ही प्रक्रिया या पुढे हि राबवण्यात येणार असून पोलीस कारवाईत काही सुधारणा करण्याची गरज आहे का? हे ही तपासले जाईल. म्हणजे गुन्हेगाराला सुधारण्याची संधी देऊन त्याच्याकडे पोलिसांनी आणि समाजाने गुन्हेगार म्हणून बघू नये.. त्याला हि सर्वसामान्य माणसांप्रमाणे सन्मानाने जगता यावे असा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. यासाठी समाजातील विविध घटकांची, अभ्यासक , पत्रकार, आणि इतर मान्यवरांची ही मदत घेतली जाईल. कोणीही जन्मतः गुन्हेगार नसतो, काही कारणे आणि परिस्तिथी त्याला गुन्हेगार बनवते मात्र या बद्दलचा अपराधीभाव त्यांच्या मनातही असतो. यातून बाहेर पडून एक नव्या दृष्टिकोनातून पाहता यावे असा प्रामाणीक प्रयत्न असल्याचे अधीक्षक धिवरे यांनी ‘झेप मराठी’शी बोलताना सांगितले.