सावधान…चिकुनगुनिया आलाय, खबरदारी घ्या !

धुळे, दिनांक ३ ऑक्टोबर, : राज्यात चिकुनगुनिया रोगाच्या प्रादुर्भाव वाढला आहे. धुळे जिल्ह्यात चिकनगुनिया आजाराचा एकही रुग्ण नसला तरी अलीकडील काळात राज्यात चिकनगुनियाचा प्रादुर्भाव काही भागात दिसून येत असल्याने त्या वाढत्या चिंतेचे निराकरण करण्यासाठी, त्यांचा प्रसार रोखण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना जिल्हा आरोग्य विभागामार्फत केल्या जात आहेत. जिल्ह्यात कंटेनर सर्वेक्षण व जनजागृती मोहिमेचे कार्य ग्रामपातळीवर आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत राबविण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
सध्या चिकुनगुनियाच्या वेगळ्या लक्षणाबद्दल जी माहिती दिलेली आहे. त्यामध्ये न्युरोलॉजीकल लक्षणे, अर्धांगवायू आणि ह्यापरपिग्मनटेशन (त्वचेवर विशेषतः नाकावर काळे चट्टे) ही लक्षणे दिसत आहे व ती गंभीर आहेत. म्हणून जनतेत भीतीचे वातावरण झाले आहे. परंतु भूतकाळात बऱ्याच रुग्णांमध्ये ही लक्षणे आढळून आलेली आहेत, चिकुनगुनिया आजारासोबत इतर आजार असल्यास उदा. डेंगू, जपानी मेंदूज्वर, झिका इ. आजारामध्येही असे लक्षणे दिसून येतात. केंद्र शासनाच्या प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचना मध्येही ही लक्षणे नमूद आहे. त्यामुळे नव्याने ही लक्षणे दिसून येतात हे खरे नाही.
वातावरणातील बदलामुळे शासकीय, खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाची संख्या वाढली आहे, जेष्ठ नागरीकच नाहीत तर सोबत लहान मुलांचीही संख्या जास्त आहे. लहान मुलांची प्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, लहान मुलांना सकस आहार द्यावा, डासांपासून बचाव करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, आजारपणात घरगुती उपचार न करता वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला घ्यावा.

चिकुनगुनियाचे मुख्य लक्षणे :

चिकुनगुनिया हा एक विषाणूजन्य आजार असून तो संक्रमित्त डासांद्वारे पसरतो. ताप, सांधेदुखी, डोकेदुखी, स्नायू दुखणे, पुरळ येणे आणि सांधे कडक होणे ही लक्षणे आहेत. बहुतेक प्रकरणे सौम्य, स्वतः ची मर्यादित असतात आणि 7-10 दिवसात बरे होतात. प्रतिबंधात्मक उपायः घरे आणि आजूबाजूचे ठिकाणाचे साचलेले पाणी काढून डासांच्या उत्पत्तीची स्थाने नष्ठ करावीत. डास प्रतिबंधक, जाळी आणि स्क्रीन केलेल्या खिडक्या/दारांचा वापर करा. संरक्षणात्मक कपडे घालावेत, विशेषतः डासांच्या वेळेत (पहाटे/संध्याकाळ) कीटकनाशक उपचार केलेल्या मच्छरदाण्या लावाव्यात.

लक्षणे कायम राहिल्यास काय करावे :

नजीकच्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला घ्यावा. प्रयोगशाळेत चाचणी करून घ्यावी, वैद्यकीय सल्ल्याचे पालन करावे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बोडके यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top