चांदवड तालुक्यातील धोतरखेडे येथे एक धक्कादायक घटना समोर आली. ६ वर्षाच्या बालकास , तो आजारी असताना पित्याने छताला उलटे लटकावून मारहाण केली. पत्नीने आक्षेप घेतला असता तिलाही लाथाबुक्क्यांनी मारले. याप्रकरणी वडनेरभैरव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एका पिता आपल्या 6 वर्षांच्या पोटच्या मुलाशी इतके निर्दयी कसे वागू शकतो ? असा प्रश्न उद्भवणारा प्रसंग चांदवड येथे उघडकीस आला. ६ वर्षाचा निलेश बेंडकुळे हा काही दिवसांपासून आजारी पडला होता. त्याला रुग्णालयातही नेण्यात आले होते. गाठ असल्यामुळे त्याची सोनोग्राफी करता त्याला पिंपळगावं बसवंत येथे नेण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु निलेशचे पिता मंगेश बेंडकुळे यांनी यास साफ नकार दिला. घरी आल्यावर निलेशच्या सोनोग्राफी वर खर्च करणार नाही असे सांगितले. त्यानंतर निलेशला छताच्या पाईपला दोरीने पाय बांधून उलटे लटकावून मारहाण केली. पत्नीसही लाथाबुक्क्यांनी मारले व जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेमुळे चांदवड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित पत्नी सुनीता बेंडकुळे ह्यांनी रात्री उशिरा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक पी. व्ही. तागड हे या प्रकरणाचा तपास करीत आहे.