धुळे : प्रत्येक निवडणुकीची एक ठरलेली प्रक्रिया असते. ही प्रक्रिया निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यावर ही प्रक्रिया सुरू होते. निवडणूक आयोग विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच निवडणूक आचारसंहिता लागू करते. देशात निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. या नियमांना आचारसंहिता म्हणतात. निवडणूक घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी या आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य आहे. एखाद्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने आचारसंहितेचे पालन केले नाही तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाते.
आचारसंहिता विस्तारीत असल्यामुळे राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी ‘काय करावे’आणि ‘काय करू नये’ याबाबत काही महत्त्वाची नियम सांगितले आहेत. ते काय आहेत ? हे जाणून घेऊया.
काय करावे ?
निवडणूक घोषित होण्यापूर्वी सुरू करण्यात आलेले कार्यक्रम पुढे सुरू ठेवता येतील. पूर, दुष्काळ व इतर नैसर्गिक आपत्ती झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी मदतीचे कार्य सुरू ठेवता येईल. आजारी असलेल्या व्यक्तींना रोख रकमेची किंवा इतर वैद्यकीय मदत देता येईल. निवडणूक सभा घेण्यासाठी मैदानांसारखी सार्वजनिक ठिकाणे सर्वांना उपलब्ध झाली पाहिजे. त्याचप्रमाणे हेलिपॅडचा वापरही सर्व पक्षांना / निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना करता आला पाहिजे. इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टीका ही त्यांची पूर्वीची कामगिरी आणि कार्य यांच्याशीच संबंधित असावी. वैयक्तिक गोष्टींवर टीका करू नये. शांततेने , सामान्य जीवन जगण्याचा प्रत्येक व्यक्तींचा अधिकार पूर्णपणे जतन करण्यात यावा. उमेदवार, राजकीय पक्षांना सभा, संमेलन किंवा रॅली काढण्यापूर्वी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. सभेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंचा वापर करण्याची परवानगी काढावी. ते वापरण्याच्या नियमांचे पालन करावे. सभांमध्ये अडथळे आणणाऱ्या व्यक्तींना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी. मिरवणूक सुरू होण्याची तसेच संपण्याची वेळ व जागा आणि ती जिथून जाणार असेल तो मार्ग अगोदर निश्चित करून पोलीसांकडून अगोदर परवानगी घेण्यात यावी. मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा होऊ देऊ नये. मतदान शांततापूर्ण होईल याची काळजी घ्यावी.
सर्व कार्यकर्त्यांनी बिल्ले व ओळखपत्र ठळकपणे लावावेत. मतदारांना पुरविण्यात येणाऱ्या ओळखचिठ्ठया साध्या (पांढऱ्या) कागदावर असाव्यात. त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव असू नये. प्रचाराच्या कालावधीमध्ये व मतदानाच्या दिवशी वाहने चालवण्यावरील निर्बंधाचे पालन करावे. निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळवलेल्या व्यक्तींनाच कोणत्याही मतदान कक्षात प्रवेश करता येईल. इतर व्यक्ती कितीही उच्चपदस्थ असली तरी ( उदा.मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, किंवा आमदार इत्यादी) तिला अटीतून सूट मिळणार नाही. निवडणूका घेण्याविषयीची कोणतीही तक्रार किंवा समस्या निवडणूक आयोग यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकांना सांगावी. निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांचे पालन करण्यात यावे. आपण एखाद्या मतदारसंघातील मतदार किंवा उमेदवार किंवा त्या उमेदवारांचा निवडणूक प्रतिनिधी नसाल तर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर आपण त्या मतदारसंघातून निघून जावे.
काय करू नये ?
राजकीय पक्ष तसेच उमेदवारांना सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात करण्यास प्रतिबंध आहे. मतदाराशिवाय इतर कोणाही मतदान कक्षात किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करू शकत नाही. शासकीय काम आणि निवडणूक प्रचार यांची सरमिसळ करू नये. मतदाराला पैशाचे किंवा अन्य कशाचेही आमिष दाखवू नये. इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या खाजगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर टीका करू नये. वेगवेगळ्या जाती, समूह आणि धार्मिक किंवा भाषिक गट यांच्यामधील मतभेद वाढतील किंवा द्वेष, तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये. सर्व धर्मिय प्रार्थनास्थळ यांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे, भित्तीपत्रके, संगीत यांच्यासाठी करू नये. मतदारांना लाच देणे, दारुचे वाटप करणे, मतदारांवर गैरवाजवी दडपण आणणे, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत प्रचार करणे, मतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच्या 48 तासांत सार्वजनिक सभा घेणे आणि मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे यांसारख्या गोष्टींना मनाई आहे. लोकांच्या मतांचा किंवा त्यांच्या कामांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने करणे किंवा धरणे धरणे या गोष्टीसही मनाई आहे.
कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आवार भिंत, वाहने इत्यादींच्या मालकाच्या विशिष्ट परवानगीशिवाय ध्वजदंड उभारण्यासाठी, निशाण्या लावण्यासाठी, सूचना चिकटवण्यासाठी, घोषणा लिहिण्यासाठी कोणीही वापर करणार नाही. (असे साहित्य आढळून आल्यास ते निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनास आणून त्यांच्याकडे जमा करावे) यामध्ये खासगी व सार्वजनिक मालमत्ता या दोहोंचाही समावेश आहे. इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्या सभा किंवा मिरवणुका यांच्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करू नये. ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा घेतल्या जात असतील अशा ठिकाणांहून मिरवणूक नेऊ नये. मिरवणुकीतील लोकांनी ज्या वस्तूचा शस्त्र म्हणून वापर केला जाऊ शकतो अशा कोणत्याही वस्तू जवळ बाळगू नयेत. इतर पक्षांनी व उमेदवारांनी लावलेली भित्तीपत्रके काढून टाकू नयेत किंवा विद्रुप करू नयेत.
मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठया वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान कक्षाच्या जवळ प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करू नये. लाऊडस्पीकर सकाळी ६:०० पूर्वी किंवा रात्री १०:०० वाजेनंतर आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय वापर करण्यात येऊ नये. पूर्वपरवानगीशिवाय, सार्वजनिक सभा आणि मिरवणुका यांच्यामध्येही लाऊडस्पीकरचा वापर करण्यात येऊ नये. सर्वसाधारणपणे अशा सभा / मिरवणुका रात्री १०:०० नंतर चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येऊ नये. निवडणुकीच्या काळात दारूचे वाटप केले जाणार नाही.
ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून तिला सरकारी सुरक्षा पुरवण्यात आली आहे, अशी व्यक्ती मतदानाच्या दिवशी, मतदान केन्द्र असलेल्या जागेच्या परिसरात (१०० मीटर्सच्या आत) प्रवेश करणार नाही. अशी कोणतीही व्यक्ती, मतदानाच्या दिवशी, त्याच्या सुरक्षा कर्मचारीरीवर्गासह मतदारसंघामध्ये फिरणार नाही.
आचारसंहितेच्या या तत्त्वांचा भंग झाल्याचे नागरिकांना आढळल्यास त्यांनी सी-व्हिजील ॲपवर ऑडिओ वा व्हिडीओ या माध्यमातून तक्रार करता येईल.