विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना करावी लागणार गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी

धुळे: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लढविणारे उमेदवार आणि त्यांच्या राजकीय पक्षांना मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी करावी लागणार आहे. मा. भारत निवडणूक आयोगाने मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार याबाबत सविस्तर निर्देश आणि प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी विहीत नमुने देखील निर्गमित केले आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे.
त्यांनी सांगितले,निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाने विहीत केलेल्या शपथपत्रातील नमुन्यात प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची परिपूर्ण माहिती द्यावी. उमेदवाराविरुद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती देताना ती ठळक स्वरूपात असावी. उमेदवार एखाद्या राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत असेल, तर अशा उमेदवारांनी त्यांच्याविरुद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती संबंधित पक्षास देखील अवगत करावी. राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांविरुद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी.उमेदवार आणि राजकीय पक्षांनी प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांच्या माहितीस वर्तमानपत्रातून आणि इलेक्ट्रॅानिक मीडियाद्वारे देखील प्रसिद्धी द्यावी. अशी प्रसिद्धी निवडणूक कालावधीत आयोगाने विहीत केलेल्या नमुन्यात किमान तीन वेळा द्यावयाची आहे. आयोगाने विहीत केलेल्या सी- 1 (C-१) नमुन्यात वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॅानिक मीडियाद्वारे उमेदवारांनी प्रसिद्धी द्यावी.तसेच राजकीय पक्षांनी त्यांच्यासाठी विहीत केलेल्या सी- 2 (C-२) नमुन्यात वर्तमानपत्र, इलेक्ट्रॅानिक मीडिया आणि पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धी द्यावी. प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांच्या माहितीची तीन वेळेस प्रसिद्धी आयोगाने आखून दिलेल्या विहीत वेळापत्रकानुसारच करण्यात येईल याची दक्षता संबंधित उमेदवारांनी / राजकीय पक्षांनी घ्यावी. प्रथम प्रसिद्धी उमेदवारी अर्ज माघारीच्या तारखेपासून पहिल्या चार दिवसांतच करावी. दुसरी प्रसिद्धी यापुढील पाच ते आठ दिवसांत करावी आणि तिसरी प्रसिद्धी 9 व्या दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसांपर्यंत करावी.
उमेदवाराविरुद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर वेबसाईटवरील Know Your Candidate या लिंकवर देखील उपलब्ध राहील. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लढविणारे उमेदवार, राजकीय पक्षांनी या सूचनांची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी आयोगाचे या संबंधित निर्देशांचे अवलोकन करावे, असेही जिल्हा निवडणुक अधिकारी श्री. पापळकर यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares