दोंडाईचा – शिंदखेडा येथे तेरा जणांना डायरिया सदृश्य रोगाची लक्षणे दिसून आली. त्यातील उजनेबाई छोटू भिल ( वय ३५ रा.लंघाणे) दोंडाईचा येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला. सहा रुग्ण गंभीर असून त्यांच्यावर दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे तर उर्वरित रुग्णांवर लंघाणे येथे आरोग्य उपकेंद्र नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेत उपचार करून सोडण्यात आले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमाकांत पाटील यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या.
लंघाणे येथे आरोग्य उपकेंद्र नसल्याने उजनेबाई छोटू भिल हिला बुधवारी उलटी व पातळ संडास होत असल्याने दोंडाईचा येथे खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला. उजनेबाई हिचा मृत्यू डायरीया सदृश्य लक्षणे झाल्याचे सांगण्यात येते. आरोग्य विभागाचे पथक तात्काळ गावात दाखल झाले. तालुका आरोग्य अधिकारी रमाकांत पाटील व निमगुळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डाॅ. कविता कदम, डॉ. संजय मोरे यांच्या पथकाने लंघाणे गावात आदिवासी भागात पाहणी केली असता गावात दहाच्या वर लोकांना उलटी व पातळ संडास यासारखी लक्षणे आढळून आले. यातील सहा रुग्णांना गंभीर लक्षण आढळल्याने दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. उर्वरित रुग्णांवर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत उपचार सुरू आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी दोंडाईचा व लंघाणे येथे भेट दिली व रुग्णांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना आरोग्य पथकाला दिल्या.
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची नावे रोशनी नाना भिल (वय 8 वर्ष), विशाल भीमराव भिल(वय 5 वर्ष), चेतना मनोज ठाकरे (वय 13,वर्ष), संदीप विनोद सोनवणे (वय 10), सलोनी एकनाथ भिल (वय 13 ), समर्थ ईश्वर कोळी (वय 3 वर्षं)
उजनेबाई हिचा मृत्यू कशामुळे नेमका झाला हे जाणून घेण्यासाठी शवच्छेदन करण्यात आले आहे. अद्याप तो रिपोर्ट आलेला नसून त्यामुळे मृत्यूचे निश्चित कारण सांगता येत नाही. गावात होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे ही लागण झाली असती तर संपूर्ण गावात रुग्ण आढळून आले असते. पण तसे आढळत नाही. गावाच्या आदिवासीबहुल भागात राहणारे अनेक नागरिक मोल मजुरी करतात. शेती कामाच्या ठिकाणी देखील काही वेळेला पाणी पिण्यामुळे डायरिया सदृश्य लक्षण आढळत आहेत. ग्रामसेवकांना गावांमध्ये होणाऱ्या पाणीपुरवठा संदर्भात सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सात दिवस गावामध्ये रुग्णांचे सर्वेक्षण सुरू राहणार आहे. उलटी पातळ संडास यासारखी लक्षणे आढळत असल्यास रुग्णांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करावा.. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी केले.
प्रतिनिधी, समाधान ठाकरे,