दिव्यांग श्रेयसच्या पायात भरले बळ,नंदुरबार पोलीस प्रशासनाची माणुसकी

पोलीसांबद्दलचं सर्वसामान्यांच्या मनात फारसे चांगले मत नसते परंतु नंदुरबार पोलीसांनी मात्र याला वेळोवेळी छेद दिला आहे. श्रेयस दिलीप नांदेडकर वय ३५.शिक्षण बारावीपर्यंत तो जन्मतःच संपूर्ण दिव्यांग! हात व पाय ठार लुळे.असून नसल्यासारखेच..उभा रहाता येत नसल्याने सतत बसूनच रहावे लागते. दुसऱ्यांनेच उचलून न्यावे लागते. बोलतांना अडखळत बोलतो.परिस्थिती अत्यंत गरीब.नंदुरबार पोलीसांच्या भाड्याच्या गाळ्यात त्याचे वडील दिलीप नांदेडकर झेरॅाक्स मशीनवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. श्रेयसच्या एका हाताची थोडीशी हालचाल होते, परिस्थितीला शरण न जाता याच एका हाताने तो वडिलांना झेरॅाक्स काढायला परवापर्यंत मदत करायचा. अचानक परवा १४ एप्रिलला श्रेयसचे वडील हार्ट ॲटॅकने गेले आणि दिव्यांग श्रेयसच्या कुटुंबावर नियतीने दुसरा निर्दयी आघात केला. स्वतःलाच उभे रहाता येत नाही तेथे या वयात आईचा सांभाळ कसा करायचा या विचारांने तो सैरभैर झाला. आतापर्यंत वडील त्याला दुकानापर्यंत पाठीवर उचलून आणायचे, आता पुढे काय? जीवनाची लढायचे तर आहेच पण कसे? दिलीप नांदेडकरांचा संसार त्यांच्या पश्चात उघड्यावर पडला. पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी श्रेयसला बालावून घेतले. आईसह तो कार्यालयात आला.पुढे काय ? विचारले तर तो म्हणाला “ काही नाही..लढणार!” मग काय पोलीस अधीक्षक यांच्या एका हाकेसरशी नंदुरबार पोलीसांची टीम कामाला लागली.पुन्हा एक मोडू पाहणारा संसार उभा करायचा असा विचार पुढे आला. पोलीस अधीक्षकांसह अपर अधीक्षक विजय पवार, पो.नि.कळमकर व त्यांच्या सहकाऱ्यानी निधी जमा केला.तब्बल ६३०००/- रु. जमा झाले. या रकमेचा चेक थरथरत्या हातांनी स्विकारत श्रेयसने नंदुरबार पोलीसांचे आभार मानले. रकमेतून आता श्रेयस स्वताच्या तिनचाकी बाईकवर झेरॅाक्सच्या दुकानात जाऊ शकेल. जन्मताच दुर्बल असलेल्या श्रेयसच्या पायात नंदुरबार पोलीसांनी बळ ओतले. एका दिव्यांगास नियतीने लाथाडले पण पोलीसांनी आपलेसे केले.मागेही एका गरीब वृद्धास मदतीचा हात देऊन नंदुरबार पोलींसानी समाजापुढे एक आदर्श घालून दिला होता. पोलीस अधीक्षक कार्यालयातून घरी जाताना श्रेयसच्या डोळ्यात अश्रू होते.जाता जाता तो पोलिसांना आपल्या अडखळत्या शब्दात कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती नक्कीच म्हणाला असेल.. “मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा! पाठीवरती हात ठेवून…फक्त लढ म्हणा!!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares