शिंदखेडा तालुक्यातील ब्राह्मणे शिवारातील शेतातून पाण्याची मोटर चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ६८ हजार किमतीच्या ५ मोटर जप्त करण्यात आल्या आहेत.
शेतकरी प्रियदर्शन काशिनाथ बागले यांची ब्राह्मणे शिवारातील शेतातून पाण्याची मोटार चोरीस गेल्याची तक्रार ३१ जानेवारी २०२४ रोजी दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु असतांना पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी २० ऑक्टोबर रोजी गोपनीय माहितीच्या आधारे २ संशयितांना ताब्यात घेतले. राज भावडू कोळी आणि त्याचा साथीदार राहुल संजय भिल या दोन्ही २० वर्षाच्या तरुणांचा संशयित म्हणून समावेश आहे. त्यांनी चोरीची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या पाण्याच्या ५ मोटर म्हणजे ६८ हजार किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे .
हि कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, अमित माळी, संजय पाटील, सचिन गोमसाळे, दिनेश परदेशी, चेतन बोरसे, विनायक खैरनार, हर्षल चौधरी यांनी केली .