बिबट्याने वासरू केले फस्त नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण
शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा परिसरात बिबट्याने थैमान घातलेय. शेतात बांधलेल्या एका वासराला बिबट्याने फस्त केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तावखेड्यात राहणारे दिलीप खंडेश्वर कुलकर्णी यांनी आपल्या शेतात बांधलेल्या ८ गुरांपैकी एक वासरू बिबट्याच्या हल्ल्यात गमावले. २२ ऑक्टोबर मंगळवार रोजी मध्यरात्री बिबट्याने तावखेडा शिवारात एका वासरास भक्ष्य केले. दिलीप कुलकर्णी हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेले असता, हि बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी लागलीच या घटनेची माहिती वनविभागास कळवली.
दुपारी बारा वाजता घटनास्थळी विखरण वनरक्षक एन एफ पठाण, दोंडाईचा वनपाल प्रविण वाघ यांनी तत्काळ दखल घेऊन तावखेडा परिसरात पाहणी करून पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश राजभोज यांनी शवच्छेदन केले. वीस ते पंचवीस दिवस अगोदर देखील त्याच शेत शिवारात बिबट्या आढळून आला असल्याचे वन विभागाने सांगितले. परिसरात बिबट्याचा धुमाकूळ वाढला असून, बंदोबस्त करण्याची मागणी या घटनेनंतर जोर धरू लागली आहे.
वनविभागाने बिबट्यापासून सावध राहण्याचा इशारा दिलाय. तसेच शेतात जातांना लहान मुलांना घेऊन जाऊ नये, गुरे ढोरे हे मोकळ्या जागेत बांधू नये, ज्या परिसरात बिबट्या आढळून आला त्या परिसरात गोणपाटात मिरची गुंडाळून धूर करावा, एकट्या व्यक्तीने रात्री-पहाटे जाऊ नये, सोबत एखाद्या व्यक्ती किंवा हातात काठी किंवा मोबाइलचा टॉर्च घेऊन जावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
प्रतिनिधी समाधान ठाकरे
दोंडाईचा