उद्याच्या उदघाटन कार्यक्रमावर बहिष्कार करत वकिलांचा
धुळ्यात नव्याने बांधण्यात येणाऱ्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन बिल्डिंगमध्ये वकिलांना बसायला पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने होणाऱ्या धुळे जिल्हा न्यायालय नुतन इमारतीच्या बांधकामाच्या उदघाटन कार्यक्रमावर उद्या दि.२३ रोजी वकिलांनी लालफित लावून प्रशासनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. धुळे बार असोसिएशनचा कोणताही सभासद या कार्यक्रमास उपस्थित राहणार नाही. कार्यक्रमस्थळी वकील सदस्य उपस्थित आढळल्यास त्याचे सभासदत्व जिल्हा बार असोसिएशनमधून रद्दबातल करण्यात येईल,असे वकिलांच्या बैठकीत सर्वानुमते ठरले आहे. जिल्हा वकिल संघाच्या सदस्यांच्या मागण्या मान्य न केल्याने वकिलांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.
सकाळी १० वाजता जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर जाहिर निषेध करण्यासाठी सर्व वकिल वर्ग उपस्थित राहतील, अशी माहिती धुळे जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष ॲड.राहुल बी. पाटील व पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
वकील संघाच्या सातत्याने पाठपुरावा करून देखील जिल्हा न्यायालय प्रशासनाकडून नुतन जिल्हा न्यायालयाचा इमारतीचा प्रस्तावित नकाशा देण्यात आलेला नाही. नुतन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत वकिलांना अत्यल्प व तुटपुंजी बैठक व्यवस्था होणार असल्याची माहिती मिळाल्यावर जिल्हा वकिल संघाने मुख्य न्यायमुर्ती. मुंबई उच्च न्यायालय यांचेसह इतर संबंधित न्यायमुर्ती व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसह संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन दिले. सदर मागण्यांच्या अनुषंगाने कारवाई प्रलंबित असताना धुळे जिल्हा न्यायालय प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत घिसड-घाईने दि.२३ रोजी प्रस्तावित नविन धुळे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामाचे उद्घाटन केले जात आहे.