धुळे तालुक्यात प्रशिक्षण वर्गास गैरहजर असणाऱ्या 102 कर्मचाऱ्यांना नोटीस इश्यू : कारवाई कडे लक्ष

धुळे ग्रामीण मध्ये मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता

धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी धुळे तालुक्यात कार्यरत असलेल्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी ज्योती चित्रमंदीर, लहान पुलाजवळ, धुळे येथे प्रथम प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. तीन टप्प्यात हे प्रशिक्षण झाले.1794 कर्मचाऱ्यांपैकी 1692 प्रशिक्षणास हजर होते. 102 कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणास दांडी मारली. गैरहजर मध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी एक, इतर मतदान अधिकारी,शिपाईचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी धुळे रोहन कुवर यांनी प्रशिक्षणास गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्या अनुषंगाने धुळे तहसील कार्यालयात युद्ध पातळीवर काम सुरू होते. निवडणुकीची ड्युटी रद्द करण्यासाठी धुळे तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांची गर्दी होती. त्यात विविध अर्ज फाटांचा समावेश होता. धुळे तालुक्यात मनुष्यबळाची कमी असल्याने महिला कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम देण्यात आले आहे. काही कार्यालये, संस्थांनी अपेक्षित कर्मचाऱ्यांचे सहकार्य निवडणूक विभागाला केले नसल्याचे सूत्रांनी बोलताना सांगितले. याबाबत निवडणूक विभाग काय ॲक्शन घेते याकडे लक्ष लागून आहे.
प्रशिक्षणास गैरहजर कर्मचाऱ्यांनी 24 तासाच्या आत लेखी खुलासा नोटीस प्राप्त झाल्यापासून कार्यालयीन वेळेत समक्ष उपस्थित राहून सादर करावा. लेखी खुलासा सादर न केल्यास अथवा खुलासा असमाधानकारक असल्याचे आढळून आल्यास गैरहजर कर्मचाऱ्यांच्या विरुध्द अधिनियमाच्या तरतुदीनुसार कारवाई केली जाणार आहे. तसा प्रस्ताव जिल्हा निवडणूक अधिकारी यांचेकडे दिला जाणार आहे. सेवा शिस्त व अपिल 1979 अन्वये शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्ताव विभाग प्रमुख यांचेकडे परस्पर पाठविण्यात येणार आहे.

प्रतिनिधी तुषार देवरे,देऊर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares