सोनगीर येथील जोशाबा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षी अंध, अपंग दिव्यांग बांधवांना दिवाळी सण आनंद आणि उत्साहाने साजरा करता यावा म्हणून मंडळाच्या वतीने दिवाळीला किराणा साहित्याचे वाटप करण्यात येते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील जी बागुल हायस्कूल च्या पटांगणात हा कार्यक्रम पार पडला.
संपन्न झालेल्या कार्यक्रमात 80 अंध महिला, पुरुषांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच दोन्ही हात नसलेल्या एका बालकास किराणा साहित्य सोबत ड्रेस, बूट ,शूज भेट देण्यात आली. एका पायाने अपंग अजित पठाण या युवकास कृत्रिम पाय देण्यात आला. दोन अंध व्यक्तींना सेन्सॉर काठी देण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सोनगीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस होते. तसेच श्यामलाल मोरे, अविनाश महाजन, राजेंद्र महाजन, लखन ठेलारी, आरिफ खाॅ पठाण, अमित बागुल, किशोर पाटील, योगेश पाचपुते, जयराम बारकु माळी, पत्रकार एल बी चौधरी, रोशन जैन, जितेंद्र बागुल, शालिक पाटील, रामचंद्र पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद धनगर यांनी केले. जोशाबा सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दिलीप माळी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, आपण सर्वजण दिवाळीत फराळ बनवून, नवे कपडे घालून सण उत्साहात साजरे करतो परंतु दिव्यांग बांधव हे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे दिवाळी सण साजरा करू शकत नाहीत. यामुळे त्यांना दिवाळीचा आनंद मिळावा म्हणून संस्थेमार्फत दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येतो. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जोशाबा मंडळाचे अशोक गोविंदा माळी, देविदास बडगुजर ,रमेश माळी, अशोक माळी, जितेंद्र पाटील,केदार शैंदाणे,छगन बडगुजर, योगेश जाधव, कुणाल माळी,गोपाल कासार, नंदलाल बडगुजर, दगडू धनगर, दिलीप विसपुते यांनी प्रयत्न केले.