महाराष्ट्र विधानसभेच्या धुळे जिल्हा मतदार संघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान सुरळीत व शांततेत पार पडले असून या निवडणुकीची मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.या निवडणुकीची मतमोजणी शनिवार, 23 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 8 वाजेपासून सुरु होणार आहे. प्रत्येक एका मतदारसंघासाठी एकूण 14 टेबल लावण्यात आले असून पोस्टल मतमोजणीसाठी सहा टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक टेबलवर दोन कर्मचारी, एक पर्यवेक्षक व एक सूक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर मतदारसंघाची मतमोजणी मुकेशभाई पटेल टाऊन हॉल, शिरपूर येथे होणार आहे. शिरपूर विधानसभा मतदार संघात एकूण 336 मतदान केंद्र आहेत. एका फेरीत 14 मतदान केंद्रांची मतमोजणी होणार आहेत. त्यानुसार मतमोजणीच्या एकूण 24 फे-या होतील.या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी एकूण 250 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शरद मंडलिक यांनी दिली आहे.
शिंदखेडा विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम, कुमरेज रोड, शिंदखेडा येथे होणार आहे. शिंदखेडा विधानसभा मतदार संघात एकूण 338 मतदान केंद्र आहेत. एका फेरीत 14 मतदान केंद्रांची मतमोजणी होणार आहेत. त्यानुसार मतमोजणीच्या एकूण 24 फे-या होतील. टपाली मतपत्रिका मोजण्यासाठी चार टेबल, सैनिकांचे ई.टी.पी.बी.एस मतदान मोजण्यासाठी दोन टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी एकूण 150 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून संबंधितांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अशी माहितीही निवडणूक निर्णय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिली आहे.
