पुणे-मुंबई महामार्गावर गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास खंडाळा घाट व खोपोलीदरम्यानच्या परिसरात एका टेम्पोचे ब्रेक फेल झाल्याने चालकाने पुढे जाणाऱ्या बसला पाठीमागून भरधाव वेगाने धडक दिली. त्यामुळे प्रवासी बस रस्त्याच्या कडेला २० फूट खड्ड्यात उलटून पडली. अपघातात ३ जण गंभीर असून ९ जण जखमी झाले आहेत.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि खाजगी प्रवासी बस सांगोला ते मुंबई येथे निघाली होती. त्यावेळी कोंबडी वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचा त्यावरचा ताबा सुटला . टेम्पो पुढे असणाऱ्या बसला धडकली आणि बस दरीत कोसळली. या अपघातात शाहिद मोहोम्मद , इरफान अयुब खान व कैफ शेख मोहोम्मद इनामदार हे टेम्पोतील प्रवासी गंभीर जखमी झालेले असून त्यांना एमजीएम हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना कामठीतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच आरआरबीचे देवदूत पथक , खोपोलीचे अपघात पथक , एचएसपी व खोपोली पोलीस ठाण्याच्या यंत्रणेने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु करून सर्व प्रवाशांना सुखरूपपणे वाहनातून बाहेर काढले.
अपघातात दरीत कोसळलेल्या बसला सकाळच्या वेळी क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही अशी माहिती खोपोली पोलिसांनी दिली.