महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने रविवार, 1 डिसेंबर,2024 रोजी साई कृष्णा रिसार्ट, पिंपळनेर, साक्री येथे शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली,शासकीय सेवा व योजनांच्या मेळावानिमित्त पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न झाली.या बैठकीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश संदीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, पिंपळनेरचे अपर तहसिलदार दत्ता शेजुळ आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले की, नवी दिल्लीतील राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, मुंबईतील महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती आणि धुळ्याचे पालक न्यायमुर्ती यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, 1 डिसेंबर, 2024 रोजी पिंपळनेर येथे शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप करावयाचे असल्याने प्रत्येक विभागाने लाभार्थ्याची निवड यादी अंतिम करावी. लाभार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. कार्यक्रमस्थळी पुरेसे पिण्याचे पाणी, अग्नीशमन, वाहन व्यवस्था, पार्किग व्यवस्था, स्वच्छतेच्या अनुषंगाने साफसफाई करावी. कार्यकमाच्या ठिकाणी सफाईसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. मेळाव्याच्या ठिकाणी लाभार्थ्यांना आणण्याची व्यवस्था करावी. माविम व उमेद यांच्या अधिनस्त बचत गटांच्या महिलांना उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात.
महामेळाव्यात शासनाच्या वेगवेगळ्या विभागामार्फत 50 स्टॉल्स लावण्यात येणार आहे. या ठिकाणी कृषी, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, महसुल विभाग, आदिवासी विकास विभाग, कौशल्य विकास, कामगार विभाग तसेच अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती पत्रकाचे वाटप करावे. या मेळाव्यास जास्तीत जास्त नागरिक उपस्थित राहतील याची दक्षता घेत हा मेळावा यशस्वी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.
बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.