एअर इंडियाची पायलट सृष्टी तुली तिच्या प्रियकराच्या छळामुळे त्रस्त होती. त्याने अनेकदा सार्वजनिक ठिकाणी तिच्याशी गैरवर्तन केले आणि तिला मांसाहार करण्यापासूनही रोखले, असा आरोप करण्यात आला आहे. त्याने 12 दिवस तिला व्हॉट्सॲपवर ब्लॉकही केलं होतं. त्याच्या छळाला कंटाळून अखेर तिने टोकाचं पाऊल उचलल्याचे चित्र समोर आले आहे.
तुली सोमवारी पहाटे अंधेरी (पूर्व) येथील मरोळ पोलिस कॅम्पच्या मागे भाड्याच्या घरात मृतावस्थेत आढळून आली. प्राथमिक चौकशीत तिचा प्रियकर आदित्य पंडितच्या छळामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिल्लीतील आदित्य पंडित (२७) याला मंगळवारी मरोळ, अंधेरी येथे सृष्टीला आत्महत्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
सृष्टी तुली यांचे गोरखपूरमध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांनी सांगितले आहे कि, आदित्य पंडित यानेच तिची हत्या केल्याचा त्यांना संशय आहे आणि ती आत्महत्या असल्याचे चित्रण करण्याचा प्रयत्न तो करत आहे. पंडितने तिच्यावर सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केले . तो तिच्यावर जाहीरपणे ओरडायचा. एकदा एका पार्टीत, त्याने तिला मांसाहार खाल्ल्याबद्दल ओरडले आणि तिला पुन्हा असे करण्यापासून रोखले. तो तिच्या कारचे नुकसान करून तिला रस्त्याच्या मधोमध सोडून द्यायचा. तो तिच्या बँक खात्यातून पैसे काढत असे आणि आम्हाला संशय आहे की तो तिला ब्लॅकमेल करत होता. आम्हाला काही व्यवहार सापडले आहेत. आम्ही लवकरच हे तपशील पोलिसांसह सामायिक करू. तो तिला खूप त्रास देत असे, पण तुलीचे त्याच्यावर खूप प्रेम होते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.
तुली रविवारी काम आटोपून घरी परतली असता, पंडित याच्याशी वारंवार उशिरा येण्या-जाण्यावरून तिचा वाद झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. पहाटे एकच्या सुमारास पंडित दिल्लीला रवाना झाले. तुलीने त्याला फोनवर कॉल केला आणि ती टोकाचे पाऊल उचलणार असल्याचा कथित खुलासा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित नंतर तिच्या जागी परतला पण दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. त्याने एका कुलूप तोडणाऱ्याला कॉल केला, खोली उघडली आणि ती निपचित पडून असल्या अवस्थेत आढळून आल्याचे सांगितले. त्यानंतर तिला तातडीने मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात नेले, तेथे तुलीला मृत घोषित करण्यात आले. लवकरच तिच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
पोस्टमॉर्टम अहवालात मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. सृष्टी तुली या लष्करी कुटुंबातील होत्या. तिचे आजोबा नरेंद्रकुमार तुली 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात मरण पावले होते आणि तिच्या काकांनीही भारतीय सैन्यात काही काळ काम केले आहे. तुली ही गोरखपूरची पहिली महिला पायलट होती आणि तिला उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सन्मानित केले होते. गोरखपूर येथे तिच्या अंत्यसंस्कारात, शेकडो लोक श्रद्धांजली वाहण्यासाठी जमले होते. बुधवारी सकाळी तुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.