अहिल्यापुर येथे बारव विहिरीची श्रमदानातून स्वच्छता,पुरातत्त्व विभागाने लक्ष देण्याची ग्रामस्थांची अपेक्षा

शिरपूर तालुक्यातील अहिल्यापुर येथील ऐतिहासिक बारव विहिरीच्या स्वच्छतेसाठी सरपंच आणि स्थानिक ग्रामस्थांनी गुरुवारी श्रमदान मोहीम राबविली. या मोहिमे अंतर्गत विहिरीची स्वच्छता करण्यात आली. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रदीप पवार यांनी बुधवारी या विहिरीची पाहणी करून सूचना दिल्या होत्या.खानदेशातील बारव विहिरींना सुमारे चारशे ते पाचशे वर्षांची परंपरा आहे .तसेच काही बारवांचा काळ बाराव्या तेराव्या शतकातील असल्याचे जाणकार सांगतात. बाराव विहिरींचे वैशिष्ट्य असे की, या विहिरींच्या शास्त्रशुद्ध रचनेमुळे या विहिरी स्वतःबरोबर परिसरातील इतर विहिरी आणि नद्या नाले ओढे यांचे स्रोत जिवंत ठेवण्याचे काम करतात. तसेच हे स्रोत बारमाही जिवंत असतात. शिरपूर तालुक्यातील अहील्यापुर येथे अशीच ऐतिहासिक कालीन विहीर आहेत. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात या विहीरीचे बांधकाम झाल्याचे सांगितले जाते. बुधवार दिनांक 15 जून रोजी दुपारी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रदीप पवार यांनी अहील्यापुर येथे जाऊन विहिरीची पाहणी केली. त्यावेळी परिसरात अस्वच्छता दिसून आल्याने सदर विहिरीची स्वच्छता करणे करणेबाबत श्री. पवार यांनी सूचना दिल्या होत्या. यावेळी सरपंच संग्राम सिंग राजपूत, ग्रामसेवक रमेश जाधव यांनी विहिरी बद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच सदर विहिर ही ऐतिहासिक ठेवा असून त्याचे जतन होण्यासाठी पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. सदर विहीर पुनर्जीवित झाल्यास गावासाठी पाण्याचा जिवंत स्रोत निर्माण होणार आहे. तसेच परिसरातील जल स्त्रोतांची जल पातळी वाढण्यास मदत मिळणार आहे .या ऐतिहासिक स्थळाचे संवर्धन झाल्यास पर्यटनाला चालना मिळून गावकऱ्यांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळण्यास मदत होणार आहे .अशाच प्रकारची विहीर विखरण येथील भवानी मंदिरासमोर असून त्या विहिरीची देखील श्री. पवार यांनी पाहणी केली. तालुक्यात चांदपुरी आणि करवंद येथे देखील बारव विहिरी आहेत . पुरातत्त्व विभागाने लक्ष दिल्यास बारव विहीर यांच्या रूपातील या ऐतिहासिक ठेव्याचे संवर्धन होण्यास मदत मिळणार असल्याची भावना शिवप्रेमी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares