महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठं यश मिळवलं आहे.महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या या यशाचं श्रेय लाडकी बहीण योजनेला दिलं आहे. महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना निवडणुकीत निर्णायक ठरली असं मत अनेक राजकीय विश्लेषकांनी मांडलं आहे. त्याचबरोबर महायुतीच्या नेत्यांनी देखील ते मान्य केलं आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील महिलांना आश्वासन दिलं होतं राज्यात पुन्हा सत्ता मिळाली तर आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा २,१०० रुपये देऊ. राज्यात आता महायुतीची सत्ता आली आहे. त्यामुळे या योजनेतील पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात २,१०० रुपये कधी येणार याची प्रतीक्षा आहे.
मात्र, महिलांना २१०० रुपये मिळण्यास ७ ते १० महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार असं चित्र दिसतंय. नोव्हेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता मिळेल असं राज्य सरकारनं जाहीर केलं होत. मात्र नोव्हेंबर उलटला तरी योजनेचा हप्ता मिळालेला नाही.. आणि त्यातच वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेबाबत मोठं भाष्य केलंय. त्यांच्या वक्तव्यावरून सध्या तरी लाडक्य बहिणींना २१०० रुपये मिळण्यास विलंब होऊ शकतो हे जाणवतंय.
मुनगंटीवार यांनी नुकतीच दी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. या मुलाखतीवेळी त्यांनी लाडकी बहीण योजना, या योजनेबाबत महायुतीची भूमिका, निवडणुकीआधी दिलेलं आश्वासन व त्यावरील वाढीव खर्चाबाबत रोखठोक भूमिका मांडली. त्यावेळी त्यांनी पुढल्या वर्षीच्या भाऊबीजेपासून वाढीव रक्कम देऊ असे संकेत दिले आहेत. त्यामुळे सध्या तरी लाडक्या बहिणींना योजनेच्या वाढीव रकमेसाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचंच चित्र आहे..