गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांची गोपनीय माहिती पाठवणाऱ्या एका आरोपीला पकडले आहे.
गुजरातच्या ओखा पोर्टचा कर्मचारी दीपेश गोहील हा भारतीय जहाजांची संवेदनशील माहिती पाकिस्तानी एजंटला देत होता. ह्या माहितीच्या मोबदल्यात त्याला रोज 200 रुपये मिळत होते. त्याने आतापर्यंत 210 सीक्रेट पाकिस्तानला दिल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच आतापर्यंत त्याने पाकिस्तानकडून 42,000 रुपये घेतल्याचे समोर आले आहे.
गुजरात एटीएस कोस्ट गार्डसोबत समुद्र किनाऱ्यावरुन होणारी अंमलीपदार्थाची तस्करी रोखण्याचे काम करत आहे. अशावेळी कोस्ट गार्डच्या जहाजांची माहिती पाकिस्तानला उपयुक्त ठरणारी आहे. तसेच युद्धाच्या काळात ही माहिती कोणत्याही देशासाठी धोकादायक सिद्ध होऊ शकते. मागील महिन्यातही पंकज केटिया याला अटक केली होती. तो ही कोस्ट गार्डची माहिती पाकिस्तानी एजंटला देत होता.पाकिस्तानी एजन्ट्स नेहमी कमी पैशांत माहिती देणाऱ्या लोकांच्या शोधात असतात.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपेश फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात आला. स्वतःला ‘साहिमा’ असल्याचे सांगून ती दीपेशसोबत बोलत होती. फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर व्हॉट्सअॅपवर त्यांची ओळख अधिकच वाढली. तिने दीपेशकडून ओखा पोर्टवर असलेल्या कोस्ट गार्डच्या जहाजांचे नावे आणि नंबर मागितले. हे सगळे दिपेशने पुरवले आणि पैसे आपल्या मित्राच्या अकाऊंटवर ऑनलाईन पद्धतीने पैसे मागवले. तो त्याच्या मित्राकडून रोख पैसे घेत होता. त्या एजंटची खरी ओळख अजून समोर आलेली नाही.