धुळे शहरातील नकाणे रोडलगत पांझरा नदी पुलावर डीजे वाहन एका दुचाकी वर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. बुधवारी, ४ डिसेंबर रोजी सायंकाळी हि घटना घडली. गाडीचा अचानक ब्रेक न लागल्याने ती जागेवरच पलटी झाली आणि दुचाकीचा चक्काचूर झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी डीजे वाहन आणि एक्टिवा दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सिंधी कॅम्पच्या दिशेने पांझरा नदी पुलावरून नकाने रोडवरील साईबाबा मंगल कार्यालयाकडे डीजे वाहन जात होते. त्यावेळी अचानक डीजे वाहनाच्या पुढे एक दुचाकी आली. त्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात डीजे वाहनचालकाने जोरात ब्रेक दाबले. त्यामुळे वाहनाचा ताबा सुटला आणि डीजे वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एक्टिवा दुचाकीवर पलटी झाले.
अपघातानंतर काही काळ रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे.
प्रतिनिधी कार्तिक सोनवणे
झेप मराठी, धुळे.