शिरपूर तालुक्यातील व सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले थाळनेर येथे आज दिनांक ०७ डिसेंबर रोजी श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे.
शिरपूर तालुक्यातील थाळनेर हे गाव प्राचीन राजधानीचे शहर व भारताची गान कोकिळा स्व.लता मंगेशकर यांचे आजोळ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी श्री खंडेराव महाराजांची यात्रा मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध चंपाषष्ठीला सुरू होते.थाळनेर येथील बस स्टँडच्या पश्चिमेला श्री.खंडेराव महाराजांचे मंदिर आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धार कै. माई मंगेशकर यांनी कै. हरिदास रामदास लाड यांच्या पुण्यस्मरणार्थ केला. जुन्या मोडकळीस आलेल्या मंदिराच्या शेजारीच खंडेराव महाराजांचे नविन मंदिर सन १९६७ साली मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठीला बांधून पूर्ण केले त्या वर्षापासून मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठीला थाळनेर येथे यात्रा भरण्यास सुरुवात झालेली आहे.
थाळनेर हे गाव प्राचीन काळापासून थालेश्वर राजधानीचे गाव म्हणून ओळखले जाते. तापी नदीच्या तीरावर असलेल्या या नगरीत श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवासाठी पंचक्रोशीतील यात्रेकरू भक्तीभावाने येतात. या दिवशी सकाळपासून खंडेराव महाराजांचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविकांची एकच गर्दी होते. यात्रोत्सवा निमित्त येथील यात्रा समितीने पारंपारिक पद्धतीने तमाशाचे आयोजन केलेले आहे. सायंकाळी गावातील मुख्य रस्त्यावरून
तगतराव (रथ) फिरविला जात असतो.यात्रेच्या दिवशी खंडेराव महाराज मंदिराच्या परिसरात लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होत असतो.मंदिर परिसरात जागा उपलब्ध नसल्यामुळे यात्रोत्सवात मिठाईची दुकाने,भांड्यांची दुकाने, मनोरंजन साधने,महिलांचे सौंदर्य प्रसाधनाचे दुकाने,पाळणे, माठ,नारळ व खेळणी विक्रेतांसह विविध व्यावसायिकांनी आपली दुकाने खंडेराव पाडा या भागात थाळनेर – मांजरोद रस्त्यावरील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा आपली दुकाने थाटवलेली असतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत असते.
यात्रा सतत आठ ते दहा दिवस भरलेली असते. यात्रोत्सवानिमित्त भाविकांच्या मनोरंजनासाठी खंडेराव महाराज मंदिराच्या आवारात दि.७ रोजी लोकनाट्य तमाशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.त्याच प्रमाणे यात्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम म्हणून दि.९ रोजी रात्री ८.३० वाजता ह.भ.प.रविकिरण महाराज यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.