शरद पवार आणि राहुल गांधी करणार मारकडवाडीतुन ईव्हीएमविरोधात लाँगमार्च

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीयेथे भाजपचे राम सातपुते हे निवडून आले. यावर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. राष्ट्रवादीचे जानकर आणि मोहिते पाटील यांनाच मताधिक्य देण्याचा गावकऱ्यांचा दावा असल्याने त्यांनी ई व्ही एमवर संशय दाखवीत पुन्हा मतदान घेण्याचा आग्रह केला. प्रशासनाने नकार दिल्यावर सुद्धा मारकडवाडीतील नागरिकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे ठरवून तशी तयारीही केली. मतदान पेट्या, बॅलेट पेपर, मतदानासाठी भव्य मंडप सगळ्याची तयारी केली. सकाळी मतदान करायला लोकांची गर्दीही जमली. परंतु शासनाने पोलिसांच्या मदतीने त्यांचा हा प्रयत्न मोडून काढला.
राष्ट्रभरात मारकडवाडीत झालेला प्रकार वणव्यासारखा पसरला.
पोलिसांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आ. उत्तम जानकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्यांच्यासह इतरही १०० हून अधिक ग्रामस्थांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. ईव्हीएमविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करत काँग्रेसने ईव्हीएमविरोधात लाँग मार्च काढण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे या लाँग मार्चची सुरुवात मारकडवाडीतून होणार असल्याचे म्हटले जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आ. जितेंद्र आव्हाड व आ. उत्तम जानकर यांनी शिक्कामोर्तब केले असून शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी जानकरांनी प्रसारमाध्यमांसमोर यावर भाष्य केलं. जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा एक्सवर पोस्ट टाकून अधिक माहिती दिली.

एक्सवर टाकलेल्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड म्हंटले , EVM च्या विरोधात बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केलाय.
पोलिसांची ही कृती राज्यभरात खदखदत असणारा EVM विरोधी असंतोषाला अजूनच चालना देणारा ठरेल यात वाद नाही.परिणामी संपूर्ण राज्यात “मारकडवाडी पॅटर्न” राबवायला सुरुवात होईल,याची मला खात्री आहे.
येत्या रविवारी आदरणीय पवार साहेब मारकडवाडी ला भेट देणार आहेत.राहुल गांधी देखील ईव्हीएम विरोधात लाँगमार्च मारकडवाडी येथूनच काढणार आहेत.
लोकशाहीला मारक ठरणाऱ्या EVM विरोधातील ही ठिणगी देशभर पसरो..
क्रांतीचा एल्गार एल्गार होवो..! #मारकडवाडी

यापुढे EVM विरोधी मोर्च्याला काय वळण येते हे बघणे उत्सुकतेचे राहील. तसेच मारकडवाडी सारखे छोटे गाव या मोहिमेचे केंद्रस्थान बनत आहे कि काय ? हेही कळेलच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares