राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं.राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकारने आपली सत्ता स्थापन केली असून, राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा देखील पार पडला. अशातच कोणत्या पक्षाला कोणतं मंत्रीपद मिळणार याकडे आमदारांसह राज्याचं लक्ष लागलं आहे. मंत्रीमंडळ विस्ताराआधी पक्षात मंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली असून गुलाबराव पाटील, दीपक केसरकर यांच्यासह काही अन्य आमदारांना मंत्रिमंडळात स्थान नको असं म्हणत शिवसेनेच्यात आमदारांनी विरोध दर्शवला आहे.पक्षातील नेत्यांनीच काही माजी मंत्र्यांना पुन्हा मंत्रीपद देऊ नये अशी मागणी केली आहे.
शिंदेंच्या पक्षातील आमदारांकडूनच काही माजी मंत्र्यांना विरोध होताना पहायला मिळतोय. मंत्रिमंडळात काही माजी मंत्र्यांना स्थान देऊ नका अशी चर्चा आमदारांमध्ये होऊ लागली आहे. यामध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार, दिपक केसरकर, तानाजी सावंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड यांच्या नावाचा समावेश आहे.या नेत्यांकडे गेल्यावर कामचं होत नाही. हे नेते केवळ आश्वासनं देतात प्रत्यक्षात कामं होत नसल्याचा आरोप आमदार खासगीत करतात अशी माहिती आहे.या करीत काही माजी मंत्र्यांना पुन्हा मंत्रीपद देऊ नये अशी मागणी केली जात आहे.
महायुतीतील नेत्यांमध्ये चर्चेने देखील तिढा सुटत नसल्याने अखेर तिन्ही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. आज (बुधवारी) दुपारी तिन्ही नेते दिल्लीत जाणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार आहे. त्यात विस्ताराचा अंतिम निर्णय घेण्यात येणार असून लवकरच मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जात आहे.