धुळ्याचे नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांनी नागपूर अधिवेशन काळात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन धुळ्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत चर्चा करून निवेदन दिले. ज्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 पारोळा रोड चौफुली ते बाळापूर फागणे पर्यंतचा रस्ता चौपदरीकरण करण्याची विनंती केली. कारण हा रस्ता फागण्यापासून पुढे चौपदरी आहे. हा उर्वरित रस्ता चौपदरी झाल्यास वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे होणार आहे. तसेच हॉटेल रेसिडेन्सी पार्क पासून एमआयडीसीतील डीसान ऍग्रो पर्यंतचा सर्विस रोड बऱ्याच ठिकाणी ब्रेक आहे व या सर्विस रस्त्याची अवस्था ही अत्यंत वाईट आहे. याच रस्त्याने एमआयडीसीतील कंपन्यातील असंख्य कामगार तीन शिफ्ट मध्ये ये-जा करीत असतात. त्यामुळे या रस्त्यावर पथदिवे ही लावणे गरजेचे आहे. या सर्विस रोडमुळे मुख्य रस्त्यावरील दुचाकी वाहनांची वर्दळ ही कमी होईल व अपघाताचे प्रमाणही कमी होईल.कामगारांची व उद्योजकांची सुरक्षित प्रवासाची सोय होईल. तरी सर्विस रस्त्याचे काम ताबडतोब होऊन पथदिव्यांची व्यवस्था व्हावी असेही या निवेदनात म्हटले आहे. तसेच नागपूर महामार्गावरील पथदिव्यांचेही काम त्वरित व्हावे अशी विनंती ना.गडकरींना केली असून या सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन मंत्री महोदयांनी ताबडतोब कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने ना. गडकरींनी आ. अनुप अग्रवाल यांचे विशेष कौतुक करीत त्यांचा सत्कारही केला. याप्रसंगी राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. जयकुमार रावल यांचीही उपस्थिती होती.
