दोंडाईचा पोलसांनी घरफोडी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीवरून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केली असता तिघांनी आणखी एका साथीदारासह दोंडाईचा शहरातील सिंधी कॉलनीत घरफोडी केल्याची कबुली दिली असून चोरी केलेला ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल काढून दिला आहे.
दोंडाईचा शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी शंकर मनोहरलाल खत्री हे आपल्या परिवारासह दिल्ली येथे गेले होते. ही संधी साधून चोरटयांनी १८ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास त्यांचा बंद घराच्या खिडकीची ग्रील काढून घरात प्रवेश केला. चोरटयांनी सोन्याचांदीच्या दागिन्यांसह मोबाईल – कॅमेरा – सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर आणि रोकड लांबवली होती. याप्रकरणी २३ नोव्हेंबर रोजी शंकर खत्री यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगानेपोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना गुप्त माहिती मिळाली कि, दोंडाईचा – शहादा रोडवरील तोल नाक्याजव दोन व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असून त्यांच्याकडे चोरी केलेले घड्याळ आहे. त्यानुसार, निरीक्षक परदेशी यांनी त्यांचे अधिनस्त अधिकारी व गुन्हे शोध पथकातील अमंलदारांना संबधीत व्यक्तींचा शोध घेवून कारवाई करण्याच्या सुचना दिल्यात. पथक टोलनाक्याजवळ जावून संबधीतांचा शोध घेत असतांना दोघे जण पोलिसांना पाहुन पळु लागले. त्यामुळे पथकाने त्यांना शिताफिने पकडुन त्यांची विचारपुस केली असता त्यांनी आपली नावे शरद काशिनाथ भिल व खंड्या उर्फ साजन सोमा ठाकरे रा. दोंडाईचा असे सांगितले. त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याने तसेच पथकाने त्यांना विचारलेल्या प्रश्नांबाबत दोघांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांना पथकाने ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले. त्यांची कसून चौकशी केली असता दोघांनी सिंधी कॉलनीत घरफोडी केल्याची कबुली दिली. ही घरफोडी करतांना आमचे सोबत बाबु उर्फ चंद्रकांत दिलीप तमायचेकर व नवनाथ ठाकरे हे दोघे देखील होते. अशी माहिती दिली. त्यामुळे या दोघांचा पथकाने शेध घेतला असता बाबू उर्फ चंद्रकांत तमायचेकर रा. दोंडाईचा हा मिळून आला. तर नवनाथ ठाकरे पसार झाला आहे. त्याचा शोध सुरु असून लवकरच त्यास ताब्यात घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. पकडलेल्या तिघांना दोंडाईचा पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईत कोठडीतील तिघांकडून चोरी केलेल्या मुद्देमालातील १० हजार रुपये किंमतीचे १ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, १५ हजार रुपयांची रोकड, १३ हजार ५०० रुपये किमतीचे चांदीचे चाळ, १ हजार रुपयांचे चांदीचे जोडवे, १ हजार रुपयांची पावरबँक, ५०० रुपयांचे घडयाळ असा एकूण ४१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीकडून चोरी व घरफोडीचे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, शिरपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पोलीस उपनिरीक्षक नकुल कुमावत, हवालदार रवींद्र गिरासे, हिरालाल सुर्यवंशी, महेश शिंदे, प्रवीण निंबाळे यांनी केली आहे.
प्रतिनिधी समाधान ठाकरे, दोंडाईचा