धुळे : अक्कलपाडा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन सोडावे व पाणी वापर संस्थांना पाणीपट्टी भरण्याचे आदेश करावे असे निवेदन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी उपअभियंता के एस बांगर यांना अकलाडचे सरपंच अजय माळी व भदाण्याचे माजी सरपंच कृष्णा खताळ यांनी दिले.
अजूनही पाटबंधारे विभागातर्फे पाणी वाटपाचे नियोजन तसेच वेळापत्रक जाहीर केले गेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील पिकांचे नियोजन करता येत नाही. पाणी आर्वतनाचे वेळापत्रक जाहीर केल्यास शेतकऱ्यांना पीक नियोजन करता येईल. मुख्यतः डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडल्यास भदाणे, खंडलाय बु, बांबुर्ले, खंडलाय खु शिरधाणे,अकलाड,कावठी, मेहरगाव लोणखेडी, चौगाव येथील सर्व शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्यामुळे फायदा होईल.
तसेच यंदा खरीप पिकांच्या उत्पादनात अतिवृष्टीमुळे मोठी घट झाल्याने शेतकरी मोडकळीस आला आहे . अक्कलपाडा धरणातून डाव्या व उजव्या कालव्यातून आवर्तन सोडल्याने हजारो हेक्टर क्षेत्र हे ओलीताखाली आल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे. परंतु पाणी वाटप समितीकडून कुठल्याही प्रकारची हालचाल न झाल्याने अक्कलपाडा धरणातून आवर्तन मिळणार की नाही या विषयी शेतकरी संभ्रमात आहे.
प्रतिनिधी तुषार देवरे
झेप मराठी, देऊर