अज्ञात व्यक्तीने लावली शेतातील खळ्यांना आग , धुळे तालुक्यातील नेर येथील घटना

धुळे तालुक्यातील नेर येथील नूरनगर शिवारातील तीन शेतकऱ्यांच्या खळ्यांना अज्ञात व्यक्तीने २३ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जाणीवपूर्वक आग लावली. यात तिन्ही शेतकऱ्यांचे खळ्यातील चाऱ्यासह धान्य, शेती अवजारे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी धाव घेत खळ्यातील जनावरे सोडली. यामुळे जीवित हानी टळली असली, तरी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

या नूरनगर शिवारात पंडित जगन्नाथ देवरे, प्रवीण भीमराव पाटील व अशोक तानकू भोई यांच्या खळ्यांना आग लागली असून तिन्ही शेतकऱ्यांनी खळ्यात साठविलेला चारा, धान्याची पोती व अन्य शेतमाल तसेच शेती अवजारे आगीत खाक झाली. यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
खळ्यांना आग लागल्याचे निदर्शनास येताच नेरचे माजी सरपंच तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे, सामाजिक कार्यकर्ते दीपक शेठ खलाणे, वसंत बोरसे, मुरलीधर खलाणे, पोलिसपाटील विजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत खळ्यांतील जनावरे सोडली. म्हणून सुदैवाने जीवित हानी टळली.

नेरचे माजी सरपंच शंकरराव खलाणे यांनी तातडीने घटनेची माहिती आमदार राम भदाणे यांना दिली. आमदार भदाणे यांनी त्वरित तहसीलदार अरुण शेवाळे, धुळे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत नुकसानीचे पंचनामे करण्यासह संबंधित शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवून देण्याच्या सूचना दिली. तसेच जाणीवपूर्वक आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची सूचनाही केली. मंडलाधिकारी समाधान पाटील, तलाठी सोनवणे, कोतवाल नाना कोळी यांनी घटनास्थळी जात नुकसानीचे पंचनामे केले.

प्रतिनिधी तुषार देवरे
झेप मराठी देऊर .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top