धुळे : अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीमध्ये जाणारा शिवकालीन रायवट फड पाट आणि पाटचाऱ्यांची स्थिती खूप खराब झाली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गळती होणे आणि खिडक्यांचा पूर्णपणे तुटलेला असणे, यामुळे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करताना अडचणी येत आहेत. या समस्या अनेक दिवसांपासून उपस्थित आहेत आणि त्या त्वरित दुरुस्त कराव्या अशी मागणी नेरचे माजी सरपंच, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे आणि सामाजिक कार्यकर्ते वसंत बोरसे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नागेश वट्टे आणि उपकार्यकारी अभियंता पि.के. मेंढे यांच्याकडे आज दिनांक २४ डिसेंबर रोजी केली.
शिवकालीन फड बागायत पाट या पाटाद्वारे नवे भदाणे, जुने भदाणे, नेर, लोणखेडी येथील शेती बागायत ओलिताखाली येतात, परंतु पाटचाऱ्यांची आणि पाटमोऱ्यांची दुरवस्था झाल्यामुळे पाणी देता येत नाही. पाटातील गळती आणि तुटलेल्या खिडक्यांमुळे पाटबंधारे प्रणाली काम करत नाही. या कारणामुळे धरणात आणि नदीत असलेल्या पाण्याचा पुरेसा उपयोग शेतकऱ्यांना होऊ शकत नाही.
सदर विषय मांडत, शंकरराव खलाणे आणि वसंत बोरसे यांनी नवनियुक्त आमदार राम भदाणे यांच्याकडेही या समस्येचे समाधान काढण्याची मागणी केली होती. राम भदाणे यांच्या सूचनेनुसार आज कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी खलाणे यांनी पाटाचं सर्वेक्षण करून त्याची त्वरित अंदाजपत्रक तयार करून जलसंपदा विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्याची मागणी केली.
शिवकालीन पाटांच्या दुरुस्तीने शेतकऱ्यांना ओलिताच्या पाण्याचा व्यवस्थित पुरवठा होईल आणि त्यामुळे त्यांची शेती सुरळीत होईल. या बाबतीत लोकप्रतिनिधींनी आणि संबंधित विभागांनी त्वरित कार्यवाही करावी, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
प्रतिनिधी तुषार देवरे
झेप मराठी देऊर.