नाशिकहून नंदुरबारकडे निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एक आदिवासी महिलेची प्रसूती झाली. ही घटना बुधवारी २५ डिसेंबर रोजी सटाणा रस्त्यावर घडली. बसचालक, महिला वाहक, पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाश्यांच्या मदतीने महिला आणि तिच्या बाळाला सटाणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, आणि दोघेही सुखरूप आहेत.
बागलाण तालुक्यातील वडे दिगर येथील अजित पवार आणि त्यांची पत्नी पूजाबाई ऊसतोड कामासाठी कऱ्हाडहून नाशिककडे प्रवास करत होते. सकाळी ११ वाजता नाशिकहून नंदुरबारकडे जाणारी बस निघाली. परंतु रस्त्याचे काम चालू असल्याने खड्ड्यांमुळे बस मोठ्या प्रमाणात हिंदळत होती. यामुळे पूजाबाईला प्रसूती कळा सुरू झाल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बसच्या महिला वाहक पी. आर. राठोड यांनी चालकास बस थांबवण्याची विनंती केली. चालकाने बस एका हॉटेलजवळ थांबवली, आणि प्रवाशांना उतरवून बस रिकामी केली. वाहक राठोड यांनी महिलेला धीर देत आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवत बाळाची सुरक्षित प्रसूती केली.
सटाणा पोलीस नाईक विशाल जाधव आणि पोलीस हवालदार रूपेश ठोके हे रस्त्याने जात असताना बस थांबलेली बघून त्यांनी विचारपूस केली. परिस्थिती लक्षात येताच त्यांनी महिलेला रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. एका खासगी वाहनाच्या मदतीने महिला आणि बाळाला सटाणा ग्रामीण रुग्णालयात पोहोचवण्यात आले . आई आणि बाळ दोघेही सुखरूप असून डॉक्टर बामले परिचारिका रीना गावित यांच्यासह कर्मचारी विशाल सूर्यवंशी व वसंत अहिरे हे त्यांची काळजी घेत आहेत.
या घटनेबद्दल बस चालक आणि वाहकांचे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.