कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि एस.एस. व्हीं. पी. संस्थेचे साहित्य आणि वाणिज्य महाविद्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन ६ जानेवारी २०२५ रोजी वडजाई गावात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. मनोहर पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी संचालक प्रा. शशिकांत बोरसे, राष्ट्रीय सेवा योजना धुळे जिल्हा समन्वयक हेमंत कुमार पाटील, वडजाई गावाचे सरपंच सौ. मानसी धर्मेश देवरे, स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील मा. दिनकर अण्णा देवरे, इंग्रजी विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुरेश आगळे, माजी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. निलेश पाटील हे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील संरक्षण शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रशांत वानखेडे यांनीही शिबिराला भेट दिली.
या उद्घाटन कार्यक्रमात प्रा. डॉ. शरद भामरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, यांनी शिबिराच्या प्रारंभासंबंधी आपले विचार मांडले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककाद्वारे वर्षभरात राबवलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा प्रस्तुत केला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना धुळे जिल्हा समन्वयक हेमंत कुमार पाटील यांनी आपल्या भाषणात, “राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्यापीठस्तर, राज्यस्तर आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करण्यासाठी मोठ्या संधी उपलब्ध होतात,” असे स्पष्ट केले.
प्रमुख अतिथी प्रा. शशिकांत बोरसे यांनी शिबिरात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना योग्य वर्तनाचे महत्त्व सांगितले. “स्वयंसेवकांनी शिबिरात सहभागी होताना सकारात्मक वर्तन आणि शिकवणी घेण्यावर विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. मनोहर पाटील यांनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी व्यक्तीची बुद्धी आणि कर्म महत्त्वाची भूमिका बजावतात, असे सांगितले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेसारख्या उपक्रमाच्या माध्यमातून व्यक्तीच्या विचारशक्तीला वाव मिळतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी सत्कर्म केले पाहिजेत, असे मत मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भाग्यश्री पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्वयंसेवीका कुमारी कल्याणी चौधरी यांनी केले.
या उद्घाटन कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्दिष्टांची जाणीव निर्माण केली आणि त्यांना समाजसेवेच्या दृष्टीने अधिक सजग बनवले.