वाघाड येथे पाणलोट रथ यात्रेचे नियोजन आणि विविध उपक्रमांसाठी विशेष ग्रामसभा संपन्न

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट घटक 2.0 अंतर्गत वाघाड (तालुका दिंडोरी) येथे मंगळवारी (दि. 21 जानेवारी 2025) सकाळी 9 वाजता सरपंच सौ. आशा गांगोडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा संपन्न झाली. या ग्रामसभेत केंद्र व राज्य शासनाच्या पाणलोट विकास कार्यक्रमाच्या निमित्ताने पाणलोट रथ यात्रेचे नियोजन सविस्तर मांडण्यात आले.

ग्रामसभेत अनिल मधुकर शिंगाडे यांची ‘पाणलोट योद्धा’ म्हणून तर सौ. अनिता गांगोडे यांची ‘धरणी ताई’ म्हणून निवड करण्यात आली. जलसंधारण अधिकारी सचिन खंबाईत साहेब यांनी मृद व जलसंधारण योजनांबाबत माहिती दिली, तर पाणलोट पथक प्रमुख रवींद्र देवरे यांनी रथ यात्रेतील विविध उपक्रम व कार्यक्रमांबद्दल मार्गदर्शन केले.

या रथ यात्रेत रथाचे स्वागत, मान्यवरांचा सत्कार, पथनाट्य सादरीकरण, युवकांची ‘My Portal’ वर नोंदणी, ग्रामस्थांनी माती हातात घेऊन जलसंधारणाची शपथ घेणे, पाणलोट अंतर्गत झालेल्या कामांचे लोकार्पण, नवीन कामांचा शुभारंभ, जलपूजन, श्रमदान, वृक्षारोपण, तसेच जिल्हा परिषद शाळेतील वकृत्व, निबंध, रांगोळी व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून उत्कृष्ट विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित केले जाणार आहे. तज्ञांचे मार्गदर्शनपर भाषणही आयोजित करण्यात येणार आहे.

कार्यक्रमासाठी प्रकल्प कार्यान यंत्रणा प्रमुख विश्वासराव पाटील, ग्रामसेवक सुनील गवळी, ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्य, पाणलोट पथक सदस्य शरद शेवाळे, मनोहर मोरे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, तलाठी, कृषी सहाय्यक, महिला बचत गट अध्यक्ष व सचिव, तसेच पाणलोट समितीचे सचिव व सदस्य उपस्थित होते.

ही विशेष ग्रामसभा जिल्हाधिकारी सो. जलत शर्मा, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री जुरावत, प्रांताधिकारी श्री शिंदे, आणि उपविभागीय जलसंधारण अधिकारी अजित कापडणीस यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आली. ग्रामसभा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी व पाणलोट समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिनिधी तुषार देवरे,देऊर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top