धुळे जिल्ह्यातल्या सोनवाडी शिवारात एका 75 वर्षीय वृद्धाचा शेतातील घर फोडून 1 लाख रुपये लंपास झाल्याची घटना घडली होती. ही घटना 23 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान घडली. बद्रीनाथ दामू निकम हे वृद्ध शेतात शेतीकाम करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातील घराचा दरवाजा फोडून पेटीत ठेवलेले 1,00,000/- रुपये चोरले.
घटनेची तक्रार मिळताच धुळे तालुका पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 305(अ), 331(3) अंतर्गत गुन्हा क्रमांक 48/2025 नोंदवण्यात आला. या गंभीर प्रकरणाची माहिती पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या तपास पथकाला कामाला लावलं.
पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील आणि त्यांच्यासोबत पोहवा सुमित ठाकुर, चेतन कंखरे, विलास बागुल आणि इतर सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तक्रारदाराशी चर्चा करून संपूर्ण माहिती घेतली आणि तपासाला सुरुवात केली.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक आणि तांत्रिक पद्धतींचा वापर करून तपासाची गती वाढवण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे 3 संशयितांना ताब्यात घेतले.
संशयित कैलास संजय चव्हाण (वय 25, रा. मित्रनगर आर्वी, धुळे) याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी झालेल्या 1 लाख रुपयांपैकी 30,000/- रुपये हस्तगत करण्यात आले. उर्वरित रकमेसाठी तपास सुरू आहे.
आरोपीला ताब्यात घेऊन चोरीचा मोठा हिस्सा हस्तगत केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने छडा लावला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील करत आहेत.
धुळे पोलीसांच्या या जलद आणि प्रभावी कामगिरीमुळे या प्रकरणाचा उलगडा झाला असून उर्वरित रक्कमही लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
प्रतिनिधी कार्तिक सोनवणे