सोनगीर पोलिसांनी उघडकीस आणली पतपेढीतील चोरी, 2 किलो 300 ग्रॅम चांदी हस्तगत

सोनगीर पोलिसांनी विठठल रुखमाई नागरी सहकारी पतपेढीतील चोरी उघडकीस आणली आहे. 13 जानेवारी 2025 ते 14 जानेवारी 2025 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी पतपेढीच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल तोडून चांदी चोरून नेली.
सुरुवातीला पोलिसांना या चोरीचा मागोवा घेणे कठीण जात होते. पण, तंत्रज्ञानाचा वापर करून सीसीटीव्ही फुटेजमधून चोरांनी वापरलेली पांढऱ्या रंगाची ह्युंडाई एक्सेंट कार ओळखली. पोलिसांनी त्या कारचा तपास घेतल्यावर वाहनाचा नंबर उघडकीस आला. त्यानंतर कारचा चालक शकील शेख रफीक शेख (वय 39, धुळे) याला जळगावमध्ये पकडले आणि त्याच्याशी चौकशी केली. शकीलने चोरीची कबुली दिली.आरोपीने सांगितले की, त्याच्या साथीदारांनी देखील या चोरीमध्ये भाग घेतला. पोलिसांनी धुळे येथे जाऊन त्याचा साथीदार अकबर मुस्तकीन बागवान (वय 36) यालाही अटक केली. मात्र, एक आरोपी फरार आहे आणि त्याचा शोध घेतला जात आहे.
या गुन्ह्यात चोरलेल्या 2 किलो 300 ग्रॅम चांदीसह, आरोपींची वापरलेली ह्युंडाई एक्सेंट कारही पोलिसांनी हस्तगत केली आहे. शकील शेखवर यापूर्वी देखील विविध गुन्हे दाखल आहेत.
तपास पोलिस उपनिरीक्षक रविंद्र महाले यांच्या नेतृत्वात सुरू आहे. पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top