विश्वविजेती बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम यांनी धुळे येथील ४८ महाराष्ट्र एनसीसी बटालियनला भेट दिली. धुळे मॅरेथॉन २०२५ – सीझन ३ मध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या मेरी कोम यांनी विशेष वेळ काढून छात्रसैनिकांशी संवाद साधला. त्यांच्या भेटीमुळे कॅडेट्सना उच्चतम प्रेरणा मिळाली आणि त्यांच्या मनोबलात मोठी वाढ झाली.
या भेटीवेळी ४८ महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल शैलेन्द्रजी गुप्ता यांनी त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला. तसेच एनसीसी अधिकारी मेजर के.एम. बोरसे, सुभेदार मेजर रतनसिंग चान्डेल, बटालियन हवालदार आणि कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेरी कोम यांनी आपल्या जीवनातील प्रेरणादायी अनुभव आणि मेहनतीच्या कथा छात्रसैनिकांसमोर मांडल्या. त्यांनी कॅडेट्सना शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी राष्ट्रसेवा आणि नेतृत्वगुणांसाठी अधिक प्रेरित झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी, कॅडेट्सनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, मेरी कोम यांच्या शब्दांनी त्यांना नवीन ऊर्जा आणि आत्मबळ मिळाले. त्यांच्या भेटीमुळे एनसीसी बटालियनमध्ये नवा जोश निर्माण झाला असून, छात्रसैनिक अधिक समर्पितपणे राष्ट्रीय सेवेसाठी कटिबद्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.