धुळे : दहावी, बारावी परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार असून हे कॉपीमुक्त अभियान धुळे जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्याबरोबरच त्यांचे पालक, शिक्षक आणि संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
दहावी, बारावी परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात आज दक्षता समितीची बैठक पार पडली, या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किरण कुवर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनीष पवार उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी बारावी आणि दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त आणि निकोप वातावरणामध्ये पार पडण्याचे निर्देश दिले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनीही जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन आवश्यक त्या सुचना दिल्या आहेत.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री पापळकर म्हणाले की, प्रत्येक परिक्षा केंद्रावर बैठे पथकासह भरारी पथकाची नेमणूक करण्यात यावी. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात कलम 144 लागू करण्यात यावा. परिक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स दुकाने परिक्षा कालावधीत बंद ठेवण्यात यावी. संवेदनशील केंद्राचे ड्रोनव्दारे चित्रीकरण करावे तसेच त्या केंद्रावर जादा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा. परीक्षा केंद्रावर नियुक्त कर्मचारी व्यतिरिक्त इतरांचा हस्तक्षेप आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची सुचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नरवाडे म्हणाले की, परीक्षा केंद्रावरील अनावश्यक वर्ग खोल्या परिक्षा कालावधीत सिलबंद करण्यात येणार आहेत. तसेच परीक्षा केंद्रावर संस्थाचालकांचा हस्तक्षेप आढळून आल्यास त्यांच्या शाळेची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून प्रत्येक परिक्षा केंद्रावर मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर पोलीस अधीक्षक श्री. धिवरे म्हणाले की, कॉपीमुक्त अभियानासाठी प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये परिक्षे संदर्भात स्वतंत्र नियत्रंण कक्ष स्थापन करण्यात येणार असून परिक्षा केंद्रावर आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच गैरप्रकार करणाऱ्यांवर नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करणार असून आवश्यक तेथे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12 वी) दि.11 फेब्रुवारी ते 18 मार्च, 2025 तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.10 वी) दि. 21 फेब्रुवारी ते 17 मार्च, 2025 पर्यंत होणार असून या जिल्ह्यात 8 परिरक्षक केंद्र स्थापन करण्यात आले आहे. इ.12 वी साठी 47 केंद्रावर 13821 मुले व 10738 मुली असे एकुण 24557 तर इ. 10 वी साठी 71 केंद्रावर 15994 मुले व 12883 मुली असे एकुण 28797 विद्यार्थी प्रविष्ठ होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी श्री. पवार यांनी बैठकीत दिली.