धुळे तालुक्यातील शिरूड – बोरी परिसरासाठी गिरणा पांझण डाव्या कालव्यातून लवकरच शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष श्री कुणाल पाटील यांनी सांगितले. दरम्यान शिरूड बोरी परिसरासाठी पाणी सोडावे याकरिता श्री कुणाल पाटील यांनी गिरणा पांझण डावा कालव्याचे कार्यकारी अभियंता, उप अभियंत्यांशी नुकतीच चर्चा करून पाणी सोडण्याबाबत मागणी केली. गिरणा पांझण डावा पाटकालव्यात आवर्तन सोडल्यावर धुळे तालुक्यातील शिरूड-बोरी परिसरातील शेतकर्यांच्या रब्बी हंगामाला त्याचा फायदा होवून शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
धुळे तालुक्यात रब्बी हंगामासाठी विविध मध्यम तसेच लघु प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी होत आहे. रब्बी हंगामात गहू, हरभरा, दादर,भूईमुग, कांदे तसेच फळपिके व भाजीपालाची लागवड करण्यात आली आहे. रब्बी हंगामात पिकांना मुबलक पाणी लागते, विहीरीत असलेले पाणी अपूरे पडत असल्याने रब्बी पिकांना पाण्याचा ताण पडत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. रब्बी हंगामासाठी पाणी मिळावे म्हणून धुळे तालुक्यातील लाभ क्षेत्रातील शेतकर्यांनी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री कुणाल बाबा पाटील यांची भेट घेवून पाणी सोडण्याबाबत मागणी केली आहे. यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री कुणाल बाबा पाटील यांनी गिरणा पांझण डावा कालव्याचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता यांच्याशी चर्चा करून तात्काळ पाणी सोडावे अशी मागणी केली, त्यानुसार अधिकाऱ्यानी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या तीन ते चार दिवसात गिरणा पांझण डावा कालव्याअंतर्गत असलेल्या धुळे तालुक्यातील पाटचाऱ्यांना आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे श्री कुणाल बाबा पाटील यांनी सांगितले. गिरणा धरणातून काढण्यात आलेल्या पांझण डाव्या कालव्यातून धुळे तालुक्यातील एकूण 12141 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. या कालव्यातून मोरदड, खोरदड, मोरदडतांडा, धामणगाव, चांदे,शिरुड, नाणे, सिताणे,तरवाडे, विंचूर इत्यादी गावातील शेती सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी दिले जाते.रब्बी हंगामात पाण्याची मागणी वाढल्याने शेतकर्यांच्या शेतातील विहीरींचे पाणी अपूरे पडत आहे, त्यामुळे गिरणा पांझण डाव्या कालव्यातून पाणी सोडावे अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री कुणाल बाबा पाटील यांनी केली आहे. गिरणा पांझण डावा कालव्यातून पाणी सोडल्यास शेतकर्यांच्या हजारो एकर शेतातील पिकांना लाभ होणार आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ होवून शेतकर्यांचे आर्थिक संकट टळणार आहे . संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याप्रमाणे लवकरच आवर्तन सोडले जाईल असेही श्री कुणाल पाटील यांनी सांगितले आहे.
