धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत धुळे लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित केलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी नाशिक येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीत धुळे लोकसभा मतदारसंघातील चालू आणि प्रलंबित विकासकामांची माहिती घेण्यात आली. विशेषत: पिंपळगाव ते धुळे ६ लेन करणे, मालेगाव शहरातून सर्विस रोड, कुसुंबा रोड ते चाळीसगाव चौफुली बायपास, मालेगाव – सवंदगाव – मालदे फ्लायओव्हर, मुंगसे गावासाठी सर्व्हिस रोड आणि अंडरपास, टेहरे-मालेगाव फ्लायओव्हर, धुळे शहरातील मनमाड चौफुली फ्लायओव्हर आणि साक्री रोड मोराणे गांव ते नगाव बायपास या कामांबाबत सखोल चर्चा झाली. खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी प्रलंबित कामांच्या गतीवर चिंता व्यक्त केली आणि या कामांना त्वरित सुरुवात करण्याची मागणी केली. त्यांनी विशेषत: धुळे ते पिंपळगाव आणि धुळे ते बिजासन माता मंदिर पर्यंतच्या ६ लेन राजमार्गाच्या कामाला गती देण्यावर भर दिला.
तसेच, मालेगाव-मनमाड रस्ता चौपदरीकरण, मालेगाव-शहरातून जाणारा भा.रा.रा.मा. क्र. ३ या मार्गावर सर्विस रोड सुरु करणे, मालेगाव-चाळीसगाव चौफुली काम आणि सटाणा-शहरातील स्लो गतीने होणारे काम देखील चर्चेत आले. खासदार बच्छाव यांनी भा.रा.रा.मा. क्र. ३ मध्ये प्रस्तावित केलेल्या फ्लायओव्हर, बायपास आणि विविध रस्ता कामांसाठी लागणाऱ्या निधीची मागणी केली. त्यांनी प्रशासनाला सूचित केले की, या कामांना गुणवत्ता आणि वेगाने पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
बैठकीत मालेगाव, सटाणा, बागलाण, शिंदखेडा, तसेच धुळे तालुक्यातील प्रलंबित कामांचा आढावा घेतला गेला. धुळे ते सप्तशृंगी गड (वणी) प्रस्तावित पालखी रस्ता, मालेगाव-मनमाड रस्ता चौपदरीकरण, सटाणा-शहर बायपास आणि अन्य रस्ता कामांची स्थिती सुद्धा चर्चा केली गेली. खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, या सर्व कामांना गुणवत्तापूर्ण व वेगाने पूर्ण करा, जेणेकरून धुळे आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या विकासात जलद गतीने प्रगती होईल.