आजच्या विज्ञान युगात विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणातच नव्हे, तर सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातही प्रगती केली पाहिजे. क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनेक महान व्यक्ती होऊन गेल्या आहेत, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी त्यांचं अनुकरण करायला हवं, असं प्रतिपादन धुळे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व्ही.बी. घुगे यांनी जिल्हा परिषद शाळा सांजोरी येथे पार पडलेल्या सांस्कृतिक व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात केले.
या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही सांजोरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यांची ओळख करुन देण्यासाठी करण्यात आले होते. गटशिक्षणाधिकारी व्ही.बी. घुगे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. समारंभाचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सभापती प्रा. विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या मध्यभागी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. देशभक्ती गीत, भक्तिगीते आणि विविध गाण्यांवर नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी आपले सुप्त कलाविष्कार दाखवले आणि उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रम रंगारंग झाला, ज्यामध्ये ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याव्यतिरिक्त, वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांमध्ये प्राथमिक शिक्षक पतपेढीचे गटनेते रविंद्र खैरनार, चेअरमन रवींद्र बोरसे, केंद्रप्रमुख परशुराम खैरनार, संचालक बापू पारधी, एम.के. शिंदे, सरपंच गणेश गवळी, ग्रामपंचायत गटनेते शंकर गवळी, उपसरपंच दिलीप ठाकरे, पुरोगामी शिक्षक संघटनेचे सरचिटणीस ऋषिकेश कापडे, कार्याध्यक्ष प्रशांत महाले, समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश धात्रक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष प्रियंका किशोर पाटील, सतिश जोशी, विलास पाटील, किरण मोहिते, ज्ञानेश्वर बाविस्कर आणि काकुळदे सर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी रत्नप्रभा दंडगव्हाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक विवेक चव्हाण आणि विनोद घुगे यांनी केले. प्रस्ताविक मुख्याध्यापक भुपेश वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपशिक्षिका रत्नमाला पवार यांनी केले.
प्रतिनिधी तुषार देवरे,
झेप मराठी, देऊर
