दोंडाईचा शहरातील गोसीया नगर येथे एका किराणा दुकानात चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील ६५,००० रुपये लंपास केले. पोलिसांनी जलद तपास करून दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ३०,००० रुपये जप्त करण्यात आले आहेत.
फिर्यादी सादीक रुवाब खाटीक (वय ४२, रा. गोसीया नगर, दोंडाईचा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १३ जानेवारीच्या रात्री त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरी करण्यात आली. ही घटना समजताच त्यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी तपासाचा वेग वाढवत आरोपींचा शोध सुरू केला. त्यात तौसीफ एजाज मन्यार (वय २५, रा. गोसीया नगर, दोंडाईचा) आणि साहील वाजीद पठाण (वय २१, रा. गोसीया नगर, दोंडाईचा) हे मोनाली चौफुली परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना एका टपरीजवळ ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून ६५,००० रुपयांपैकी ३०,००० रुपये हस्तगत करण्यात आले.या चोरीत सामील असलेले नुर नीसार पींजारी आणि अरबाज मेहमुद पींजारी हे फरार आहेत. पोलिसांचा त्यांचा शोध सुरू आहे आणि लवकरच त्यांना अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हि कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि शिरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी , पोलीस उपनिरीक्षक कुमावत, पोहेकॉ रविंद्र गिरासे, पोना राजेंद्र येडाईत, पोकों हिरालाल सुर्यवंशी, महेश शिंदे, प्रविण निकुंबे , गवळी यांच्या पथकाने केली.
प्रतिनिधी समाधान ठाकरे
झेप मराठी दोंडाईचा