विद्रोही साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगरात गाजणार

छत्रपती संभाजीनगर येथे २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या १९ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची घोषणा करण्यात आली आहे. या संमेलनात तीन दिवस विविध कार्यक्रम होतील.

मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी दिल्ली मराठी साहित्य संमेलन भाजप सरकारच्या प्रभावाखाली असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजकीय बनले असून आता ते शासकीय आणि पक्षीय स्वरूपात बदलले आहे. ही प्रक्रिया जनतेच्या हिताची नाही.”
विद्रोही साहित्य संमेलनाची परंपरा १९९९ पासून सुरू झाली. हे संमेलन फुले-शाहू-आंबेडकरी विचारांवर आधारित असून मुख्य प्रवाहातील ब्राह्मणी भांडवली साहित्य संमेलनाला पर्याय म्हणून उभे राहिले आहे. विद्रोही मराठी साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगरमधील आमखास मैदानात मलिकअंबर नगरीत पार पडणार आहे.
संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोक राणा हे मराठी लोकसाहित्य, संस्कृती व इतिहासाचे अभ्यासक आहेत. उद्घाटक म्हणून आंबेडकरवादी हिंदी साहित्यिक कंवल भारती (दिल्ली) यांची निवड झाली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात अनेक परिसंवाद, गटचर्चा, व्याख्याने आणि साहित्यिक संवाद होणार आहेत.

या संमेलनातील प्रमुख कार्यक्रम :
नाटके: शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला आणि बिस्मिल्ला
परिसंवाद: सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर पाच परिसंवाद
कविसंमेलने: काव्य पहाट, गझल संमेलन आणि इतर काव्यवाचन
सांस्कृतिक कार्यक्रम: आदिवासी गाणी, लोककला, चित्रकला प्रदर्शन, व्यंगचित्र, शिल्पकला
युवा कलाकारांचे सादरीकरण: रॅप गाणी आणि एकपात्री प्रयोग
विशेष प्रदर्शन: “संविधान आणि स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान” या विषयावरील पोस्टर प्रदर्शन
मान्यवरांची उपस्थिती

या संमेलनात २०० हून अधिक साहित्यिक, ७५ विचारवंत, १० कथाकथनकार, १५ गझलकार, ३५ नाट्य कलाकार, २७० लोककलाकार, ७ पत्रकार, आणि शेकडो लेखक सहभागी होणार आहेत.विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, विद्यार्थी, शेतकरी आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत.

विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे फुले, शाहू, आंबेडकरी विचारसरणीवर आधारित आहे. हे संमेलन सामाजिक विषमता, शोषण आणि अन्यायाविरोधात भूमिका घेते. यंदाच्या संमेलनात “इतिहासाचे विकृतीकरण”, “सोशल मीडियाच्या प्रभावाखाली साहित्य”, “धर्म व संस्कृतीच्या आधारे जाती निर्मूलन शक्य आहे का?” यासारख्या विषयांवर विचारमंथन होणार आहे.

संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी इंजि. सतीश चकोर, तर मुख्य निमंत्रक म्हणून ॲड. धनंजय बोरडे कार्यरत आहेत. तसेच किशोर ढमाले, कार्याध्यक्ष खलील अहमद, खजीनदार ॲड.के.ई.हरिदास, अनिलकुमार बस्ते,भाऊसाहेब जाधव, समन्वयक प्रा.भारत सिरसाठ, ॲड.वैशाली डोळस, अनंत भवरे, डॉ.धोंडोपंत मानवतकर, वजीर शेख, जितेंद्र भवरे, मधुकर खिल्लारे, सविताताई अभ्यंकर, डॉ विनय हतोले,रामदास अभ्यंकर, भीमराव गाडेकर, वैभव सोनवणे, सुधाकर निसर्ग, कबीर बोर्डे, रतनकुमार साळवे आदींसह अनेक कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे भरगच्च कार्यक्रमांसह हे संमेलन साहित्य आणि विचारांचे मुक्त व्यासपीठ ठरेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top