जिल्ह्यात आज प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल मंजुरी व प्रथम हप्ता वितरण सोहळ्याचे आयोजन

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत धुळे जिल्ह्याकरिता मंजूर लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण व घरकुल मंजुरी पत्र वितरण कार्यक्रम शनिवार, 22 फेब्रुवारी, 2025 रोजी दुपारी 3.00 वाजता कै.यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, धुळे येथे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत घरकुल मंजुरी व प्रथम हप्ता वितरण सोहळ्याची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या भगवान बिरसा मुंडा सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री.नरवाडे माध्यम प्रतिनिधींना संबोधतांना बोलत होते. यावेळी वृत्तपत्र तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री.नरवाडे म्हणाले की, ग्राम विकास व पंचायत राज विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्रक वितरण व 10 लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम राज्यस्तरावर शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

धुळे जिल्ह्यातील मंजूर 93 हजार उद्दिष्टांपैकी सर्व लाभार्थ्यांना पहिला हप्ता व घरकुल मंजुरी पत्र प्रदान करण्याचा हा महत्त्वपूर्ण सोहळा थेट प्रक्षेपणाद्वारे जिल्ह्यातील सर्व तालुका व ग्रामपंचायत स्तरावर देखील दाखविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, नागरिक, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी तसेच लाभार्थ्यांनी जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामपंचायत स्तरावर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top