धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना “बालस्नेही पुरस्कार २०२४” मिळणार!

धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या प्रतिष्ठित “बालस्नेही पुरस्कार २०२४” साठी निवड झाली आहे. उत्कृष्ट पोलीस अधीक्षक म्हणून हा सन्मान त्यांना प्रदान केला जाणार असून, या नामांकनास अधिकृत मान्यता मिळाली आहे. आयोगाच्या अध्यक्षा अॅड. सुशीबेन शाह यांच्या स्वाक्षरीचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे.

हा पुरस्कार सोहळा ३ मार्च रोजी दुपारी १ वाजता, यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि ना. अजित पवार, तसेच महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, गृह राज्यमंत्री योगेश कदम आणि महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

श्रीकांत धिवरे यांनी आपल्या कार्यकाळात गुन्हे तपासणीसह बालकांच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. पोलीस दादा, पोलीस दीदी हा अभिनव उपक्रम राबवत, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यांनी शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी संवाद साधत उपाययोजना सुचवल्या होत्या.

या उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल घेत धिवरे यांना “बालस्नेही पुरस्कार” जाहीर करण्यात आला असून, त्यांच्या कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top