स्वारगेट प्रकरणातील नराधम दत्तात्रेय गाडेचा आत्महत्येचा डाव फसला

पुणे: स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी दत्तात्रय गाडे याने पोलिसांच्या धाकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजल्यानंतर गाडेने शेतातील झाडाला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पण झाडाच्या फांदीला बांधलेली दोरी तुटली आणि तो खाली कोसळला.
गुन्हे शाखेने मध्यरात्री दीडच्या सुमारास गुनाट गावातून गाडेला अटक केली. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यात आणण्यात आले. डॉक्टरांच्या तपासणीत त्याच्या गळ्यावर व्रण आढळले. चौकशीत गाडेने आत्महत्येच्या प्रयत्नाची कबुली दिली.
गाडेच्या म्हणण्यानुसार, पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी त्याने शेतात जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, झाडाची फांदी तुटल्याने हा प्रयत्न फसला. त्यानंतर त्याने कीटकनाशक शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते मिळाले नाही.
“गाडेच्या गळ्यावर व्रण असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले आहे. मात्र, तपास सुरू असून घटनास्थळी पाहणी केल्यानंतरच याबाबत निश्चित निष्कर्ष काढता येईल.”
स्वारगेट बस अत्याचार प्रकरणामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून, आरोपीच्या अटकेमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top